लोककला, परंपरा जोपासण्यासाठी ‘महासंस्कृती महोत्सव’ – पालकमंत्री संजय राठोड

0
11

यवतमाळ, दि.१३ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रदेशांतील संस्कृती, लोककला, परंपरेचे आदानप्रदान, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यवतमाळ येथे फेब्रुवारी महिन्यात पाच दिवसीय ‘यवतमाळ जिल्हा महासंस्कृती महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 राज्यात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यानुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात या महोत्सवाच्या आयोजनाबाबत पालकमंत्री संजय राठोड आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री राठोड म्हणाले की, या महोत्सवात शासनाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. या महोत्सवाची सुरवात बहुचर्चित ‘जाणता राजा’ कार्यक्रमापासून होणार आहे. महोत्सवातील कार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. यवतमाळ हा आदिवासी, बंजाराबहुल जिल्हा असून आदिवासी समाजातील कोलाम,गोंड, प्रधान आदी जातींच्या लुप्त होत चाललेल्या परंपरा, लोककलांसाठी महासंस्कृती महोत्सवात व्यासपीठ उपलब्ध करावे. या महोत्सवात शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट, शासकीय यंत्रणेतील कलागुण असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहभागी करून घ्यावे. या महोत्सवाला ‘यवतमाळ महोत्सवा’चे स्वरूप मिळेल असे नियोजन करावे.

विविध समाजाच्या संस्कृती, रुढीपरंपरेची माहिती युवा पिढीला व्हावी यादृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिले. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धां, व्याख्यानाचे संयुक्तिक आयोजन करावे. जिल्ह्यात अनेक लोककला सादर करणारे कलाकार आहेत. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. कृषी, पर्यटन, मराठी भाषा आदी विभागाचे तसेच महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारावे. विविध विभागाच्या उपक्रमांचा एक संयुक्तिक महोत्सव आयोजित करून यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करावे. हा महोत्सव शासकीय नसून सर्वांचा आहे यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी महासंस्कृती महोत्सवाच्या तयारीची माहिती दिली. महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी यावेळी सांगितले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here