मांजरपाड्याचे पाणी येवल्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ

0
10

नाशिक, दिनांक : १४ जानेवारी २०२४ (जिमाका वृत्तसेवा) : आगामी पावसाळ्यात महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवल्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साधारण 20 कोटी 39 लाख रुपयांच्या तीन रस्त्यांचे भूमिपूजनाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक माळुंदे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार पंकज मगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवल्यातील शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आहेत. त्यासाठी सुमारे १५१ किलोमीटर पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन जूनमध्ये मांजरपाड्याचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ते काम नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विकासात्मक कामांसाठी असणाऱ्या नागरिकांच्या मागण्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांचे सर्वच प्रश्न मार्गी लावले जातील, असे मंत्री श्री भुजबळ यांनी सांगितले.

शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी

येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील प्रमुख सरदार आणि मावळ्यांचे म्युरलस लावण्यात येणार आहे. या भव्य दिव्य शिवसृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणार आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

या रस्त्यांचे झाले भूमिपूजन

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते  सायगांव  येथे मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा-२ योजनेंतर्गत येवला-वडगांव बल्हे- बल्हेगांव- गोल्हेवाडी- सायगांव-न्याहारखेडा- रहाडी या ५ कोटी ८१ लाखांच्या रस्त्याचे, पिंपळखुटे तिसरे मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा-२ योजनेंतर्गत गोल्हेवाडी-नगरसुल-पिंपळखुटे तिसरे-तालुका हद्द या ५ कोटी ४७ लक्ष किमतीच्या रस्त्याचे तर शिरसगांव लौकी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा-२ योजनेंतर्गत देशमाने-शिरसगांव लौकी- लौकी शिरसगांव- आडगांव रेपाळ या ९ कोटी ११ लाख किमतीच्या रस्त्याचे भुमीपूजन करण्यात आले.

प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा घेतला आढावा

सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याच प्रयत्नांतून येवला तालुक्यातील धुळगावसह १७ गावे पाणी व राजापूरसह ४१ गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या कामांचा मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेताना, योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिक्षक अभियंता सुबोध मोरे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here