दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

0
10

मुंबई, दि. 16 : आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार

ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शनबरोबर २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. या संदर्भात महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरु करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी श्री. जैन यांची चर्चा झाली.

जिंदाल यांच्यासमवेत ४१ हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या

देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या बीसी जिंदाल यांच्याशी ४१ हजार कोटींच्या सामंजस्य करारावरदेखील आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे ५००० नोकऱ्या इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्रात निर्माण होतील.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी चार हजार कोटी रुपयांचा करार

महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रित आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स ४००० कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला यामुळे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रकल्प सुरू होईल. अशा प्रकारे भारतात सुरू होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.

महाराष्ट्राच्या दालनात या सामंजस्य करारावर स्वाक्षरीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा उपस्थित होते. ‘महाप्रित’चे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे आणि क्वेड कंट्री नेटवर्कचे चेअरमन कार्ल मेहता यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

दावोस येथील महाराष्ट्राच्या दालनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचे (महाराष्ट्र पॅव्हेलियन) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांचेसह उद्योग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

54 व्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस येथे यावर्षी मी पुन्हा आलो आहे, गेल्या वर्षी याच ठिकाणी विविध उद्योग-कंपन्यांबरोबर केलेल्या सामंजस्य करारांमधून त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन राज्याच्या गतीला चालना दिली आहे. महाराष्ट्राला गुंतवणुकीचे सर्वोच्च राज्य बनविणे आणि ते टिकवून ठेवणे याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. यावर्षी उत्पादन, अन्न प्रक्रिया, डिजिटल- नैसर्गिक संसाधने यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये राज्यात मोठी  गुंतवणूक येईल, यावर विशेष भर दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील त्यातून शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वच घटकांना फायदा होईल, यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here