सातारा दि. 23 : सामान्य माणसापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. सामान्य रुग्णाला अत्यल्प खर्चात सर्व दर्जेदार सेवा देण्यासाठीच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यासाठी हे सरकार वचनबध्द आहे. सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्याच्या योजनातून जे-जे अपेक्षित आहे ते प्राधान्याने मिळवून देवू अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सार्वजनिक आऱोग्य विभाग व कृष्णा डायग्नोस्टीक सेंटरमार्फत सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर सिटीस्कॅन यंत्रणा सेवा सुरु झाली. त्याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. युवराज करपे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिला खैरमोडे, माजी अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे, क्रष्णा डायग्नोस्टीक सेंटर पुणेचे गौरव सचदेव, निर्मल संचेती, डॉ. प्रशांत देसाई, डॉ. हरदास, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. वैशाली चिंचकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी आग्रह असतो. खासगी हॉस्पिटलसारखी सेवा-सुविधा सरकारी दवाखान्यात मिळाली पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. त्यांचा नेहमी आम्हाला आरोग्य सेवेवर जास्त खर्च करण्याच्या सूचना असतात. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातुन येणाऱ्या रुग्णांची चांगली सोय या सेंटरमार्फत होणार आहे. राज्यात काही ठिकाणी असे सेंटर सुरु झाले आहेत. कॅथलॅब सुरु करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. ते लवकरच होईल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून ४० मॉडेल आरोग्य केंद्र करत आहोत. त्याचबरोबर शाळाही मॉडेल करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. करपे म्हणाले, जिल्हा रुग्णालयातील डायग्नोस्टीकचा लोड कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील सेंटरमुळे कमी होईल. ही सेवा अविरत सुरु राहणार आहेत. रुग्णांसाठी ही मोफत सुविधा उपलब्ध होणार आहे.