पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन सदैव तत्पर – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

0
12

मुंबई, दि. २४ : राज्यात पर्यटन वृद्धी होऊन रोजगार निर्मितीसाठी मोठी संधी आहे. पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी पर्यटन व्यावसायिकांनी केलेल्या सूचनांचा सकारात्मक विाचार करुन पर्यटकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिली.

राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीतर्फे दि. २० ते २८ जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये आज बीकेसी येथील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री श्री.महाजन बोलत होते. यावेळी राज्याच्या पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, संयुक्त राष्ट्र संघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा, विझ क्राफ्टचे संस्थापक सबा जोसेफ, पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, पर्यटनासाठी जीवनशैली आणि जीवनासाठी पर्यटन हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार आपल्याला अंमलात आणला पाहिजे, मुंबई फेस्टिवल अंतर्गत होणाऱ्या  पर्यटन परिषदेत मान्यवरांनी मांडलेल्या सूचना पर्यटन वाढीसाठी निश्चित मार्गदर्शक ठरतील.

राज्याला लाभलेला समृद्ध विस्तीर्ण समुद्र किनारा, येथील गड किल्ले, वन्यजीव, जंगले आणि येथील संस्कृती ही पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात अनेक बदल होणे अपेक्षित आहे. ज्या देशांची पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था आहे, अशा देशांकडून आपण शिकले पाहिजे. पर्यावरण पूरक पर्यटन आणि जबाबदार पर्यटनला प्राधान्य देणारे उपक्रम राबवण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

पर्यटन सचिव श्रीमती भोज म्हणाल्या की, शाश्वत आणि जबाबदार पर्यटनासाठी शासन उपक्रम राबवत आहे. पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी आई महिला केंद्रित पर्यटन धोरण देखील शासनाने आणले आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध पर्यटन धोरणे राज्यात आणण्यात येतील. या पर्यटन धोरणांची  प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे.

‘पर्यटनासाठी जीवनशैली आणि जीवनासाठी पर्यटन’ या विषयावर पर्यटन मंत्रालयाच्या ट्रॅव्हल फॉर लाइफच्या नोडल ऑफिसर डॉ.मोनिका शर्मा म्हणाल्या की, पर्यटनासाठी जीवनशैली हा प्रत्येक व्यक्तीचा विचार असेल, तर आपण अनेक क्षेत्रात बदल करू शकतो. भारतात झालेल्या जी20 परिषदेचे ब्रीदवाक्य हे ‘वसुधैव कुटुंबकम्’ – ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य  आहे. पर्यटन क्षेत्रांमध्ये स्थानिक संस्कृती आणि वस्तूचा वापर करण्याला प्राधान्य देण्यावर पर्यटनाचा भर असला पाहिजे. स्थानिक संस्कृती टिकण्यासाठी हा विचार खूप महत्त्वाचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण पूरक पर्यटन हा विचार सर्वांपर्यंत पुढे नेला पाहिजे.

‘शाश्वत पर्यटनात मुंबई आघाडीवर कसे राहील’ या विषयावर ईझी माय ट्रीपचे सहसंस्थापक प्रशांत पाटील,भारत आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे हयात हॉटेल्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुजय शर्मा सहभागी झाले.यामध्ये त्यांनी शाश्वत पर्यटन विकास यावर चर्चा केली.शाश्वत पर्यटनामध्ये कोणकोणत्या यशोगाथा आपल्याला सांगता येतील याविषयी सविस्तर माहिती दिली. शाश्वत पर्यटनातून आर्थिक विकास देखील होणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर, शाश्वत पर्यटन विकास हा लोकांना जनजागृतीच्या माध्यमातूनच सांगितला पाहिजे, असे सांगितले.

‘महाराष्ट्राची शाश्वत इकोसिस्टिम तयार करणे’ याविषयी पॅनेल चर्चासत्रामध्ये  विणा वर्ल्डचे संस्थापक सल्लागार सुधीर पाटील, हॉटेल्स महिंद्रा हॉलिडेज ॲण्ड रिसॉर्टस इंडियाचे सीईओ संतोष कुट्टी, आयटीसी हॉटेल्स वेस्ट आणि नॉर्थचे अतुल भल्ला, पर्यटन भागीदार माधव ओझा यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे निवेदन सुची त्रिवेदी यांनी केली. शाश्वत विकास हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आपली धार्मिक पर्यटनाचे क्षेत्र आहेत ती निसर्गावर आधारित आहेत त्यामुळे आपल्याला या संस्कृतीबद्दल सर्वांना माहिती आहे. शाश्वत पर्यटनाचा प्रचार करण्यासाठी लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा भाग आहे. पर्यटन विभागातून अनेक पर्यटन उद्योग तयार होतील त्यासाठी या क्षेत्राला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे सांगितले.

अभिनेत्री श्रीमती दिया मिर्झा म्हणाल्या की, प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारली पाहिजे. आपण जिथे पर्यटनाला जाऊ तिथे सोबत आपली स्वतःची पाण्याची बॉटल नेणे ही छोटीशी सवय देखील प्लॅस्टिकचा होत असलेला वापर टाळण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावेल.सर्वांना पर्यटन आवडते, मात्र हे पर्यटन करताना एक जबाबदार नागरिक म्हणून देखील आपले वागणे असले पाहिजे. फक्त बोलण्यातून नाही तर आपल्या कृतीतून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगांमध्ये पर्यावरण पूरक पर्यटनाला भर द्यावा. देशातील पर्यटन वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असेही अभिनेत्री श्रीमती मिर्झा यांनी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here