अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये – पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई दि. २४ : शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी शासनाने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. या दूध अनुदानाबाबत मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीत आढावा घेतला.

या बैठकीस पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, आयुक्त प्रशांत मोहोड, सहा निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) शहाजी पाटील यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.

जनावरांचे टॅगिंग  होणे महत्त्वाचे

शासनाने जाहीर केलेले दूध अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यास मिळण्यासाठी त्यांच्या जनावरांचे  टॅगिंग होणे महत्त्वाचे आहे. पशुधनाचे टॅगिंग व्हावे, यासाठीचे यंत्रणेने  हे काम अचूकरित्या पूर्ण केल्यास सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यास अनुदानाचा लाभ मिळेल, असेही मंत्री श्री. विखे – पाटील यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ