मानवधर्म आश्रम परिसर विकास आराखडा मंजूर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २६ : पावडदौना येथील परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमाच्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

मौदा तालुक्यातील पावडदौना येथे स्थित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने होम हवन, झेंडा वंदन, सेवक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी उपस्थिती लावली व संबोधित केले.

परमात्मा एक सेवक मानवधर्म मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर, ॲड. आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, सुनील केदार, ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, परमात्मा एक सेवक मानवधर्म मंडळाचे संस्थापक बाबा जुमदेव यांनी माणसातील देव शोधण्याचा संदेश देत चार शब्द, तीन तत्व, पाच नियमावर हा मानवधर्म स्थापन केला. बाबा जुमदेव हे स्त्री आणि पुरुष या दोनच जाती मानत मानवधर्म स्थापन करून सर्व समाजातील लोकांना एकत्र केले. त्यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे कार्य केले. महाराष्ट्रासह , छत्तीसगड,मध्यप्रदेशात या मानवधर्माचे असंख्य अनुयायी आहेत.

या मानवधर्म मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून पावडदौना स्थित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमासाठी तयार करण्यात आलेल्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे श्री.फडणवीस म्हणाले. तसेच, नागपूर-भंडारा महामार्गावरील मानवधर्म आश्रमाशेजारील पुलास मानवधर्म आश्रम नाव देण्यात येईल त्यासाठी आवश्यक कार्यवाही करू असेही त्यांनी सांगितले.

०००