‘स्टार्टअप’चे स्वप्न साकारण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ हे व्यासपीठ – मंत्री मंगल प्रभात लोढा

0
10

मुंबई, दि. २७ : विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देणे. महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योजकांचा शोध घेणे. अशा विद्यार्थ्यांचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करणे व त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करणे हे ‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

राज्यातील ग्रामीण तसेच निमशहरी भागामध्ये खूप कल्पक विद्यार्थी वर्ग आहे. त्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांचा राज्याच्या विकास प्रक्रियेत लाभ घेता येणार आहे. राज्यातील २८५ जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले. मुंबई उपनगरमध्येही विजेते नवउद्योजकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी राज्यातील सर्व विजेत्यांचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अभिनंदन केले आहे.

मंत्री  श्री. लोढा म्हणाले, हा उपक्रमाचा दुसरा टप्पा असून आता या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात  ३६ जिल्ह्यातील निवडलेल्या या २८५ नवउद्योजकांना पुढील १ वर्षासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून  इन्क्युबेशन व अॅक्सेलेरेशन सहाय्य मिळेल. त्यानंतर राज्यस्तरावर १० विजेत्यांची निवड करून त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव मिळण्यासाठी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचा दुसरा टप्पा विजेत्यांना सन्मानित करून पार पडला. या सर्व विजेत्यांना १ वर्षासाठी नाविन्यता सोसायटीकडून इन्क्युबेशन व अॅक्सेलेरेशन सहाय्य देण्यात येणार आहे. या सर्व नवउद्योजकांना शासनाच्या वेगवेगळ्या विभागाबरोबर काम करण्याची संधीही दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here