मुंबई, दि. 28 :- प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मानाचा ‘प्रधानमंत्री बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आले ‘महाराष्ट्र एनसीसी‘ला सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे याबद्दल क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी महाराष्ट्र एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.
राष्ट्र छात्रसेना अर्थात एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयाने सलग तिसऱ्यांदा सर्वोत्तम येण्याची कामगिरी बजावली आहे. प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित संचलनाच्या विशेष शिबिरात महाराष्ट्र संचालनालयाला प्रतिष्ठेचा ‘पंतप्रधान ध्वज‘ प्रदान करण्यात आला.
देशभरात एनसीसीची 17 संचालनालये आहेत. या सर्व संचालनालयांमधील निवडक छात्रसैनिकांचे प्रजासत्ताक दिन शिबीर दिल्लीत होते. या शिबिराचा समारोप वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या व एकूणच शिबिरातील विविध स्पर्धांमध्ये चांगले कार्य केलेल्या संचालनालयाला मानाचा ध्वज व चषक प्रदान सोहळ्याद्वारे होतो. हा सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्यामध्ये महाराष्ट्र संचालनालयाला ध्वज व चषक प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र संचालनालयाने या आधी 18 वेळा हा ध्वज पटकावला. 2002 ते 2013 या दरम्यान सलग 12 वेळा महाराष्ट्र संचालनालय विजेते होते. 2020, 2021 मध्ये ते उपविजते ठरले. 2022, 2023 व 2024, असे सलग तीन वर्षे संचालनालयाने ध्वज मिळवला आहे.