शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा ‘भीमा कृषी महोत्सव’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि.29 (जिमाका) : राज्यातील शेतकरी हा मानी आहे. तो सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतो. येथे भरलेला ‘भीमा कृषी महोत्सव’ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा महोत्सव आहे, असे गौरवोग्दार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
मेरी वेदर ग्राऊंडवर दि. 26 ते 29 जानेवारी या कालावधीत भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील, खासदार धनंजय महाडीक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार सर्वश्री के.पी.पाटील, अमल महाडीक, राहुल चिकोडे, नाना कदम, बाबासाहेब आसुर्लेकर, अरुंधती महाडीक, पृथ्वीराज महाडीक, विश्वराज महाडीक, आदील फरास आदी उपस्थित होते.
श्री. पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी अशा महोत्सवातून नवनवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे, भविष्यात डीपीडीसीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव भरविता येईल का याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या आगामी बैठकीत, हार्वेस्टरला सबसिडी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे सुतोवाच त्यांनी केले. तसेच दूध, संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत केली तर द्राक्ष, कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेवू नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी असे कृषी महोत्सव सर्वत्र व्हावेत तसेच ग्रामीण भागामुळे ग्राम संस्कृती टिकून राहते त्यामुळे गावे अबाधित रहायला हवीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या करवीर (प्रथम) भुदरगड/ कागल (व्दितीय) तर हातकणंगलेच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना तृतीय क्रमांकाने तसेच निवृत्त सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनिल काटकर यांना ‘भीमा कृषी जीवन गौरव’ पुरस्काराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
या कृषी महोत्सवात नेर्ली येथील सागर पाटील, यांच्या खिलार खोंडाला ‘चॅम्पियन ऑफ शो’ तर गोलू टू या रेड्यास ‘बेस्ट ऑफ द शो’ या पुरस्कारने गौरविण्यात आले. गेली 4 दिवस मेरी वेदरच्या मैदानावर चाललेल्या या कृषी महोत्सवाला किमान 6 ते 7 लाख शेतकऱ्यांनी भेट दिली तर साधारणता या महोत्सवाव्दारे किमान 15 कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार धनंजय महाडीक तर आभार प्रदर्शन कृष्णराज महाडीक यांनी केले.
000