महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे मिरजच्या वैभवात भर – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
9

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : महिला व नवजात शिशु रूग्णालयामुळे मिरज शहराच्या वैभवात भर पडेल. नागरिकांना आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, वीज इत्यादि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‍निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.

मिरज येथे 100 खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, माजी नगरसेविका डॉ. नर्गिस सय्यद यांच्यासह रूग्णालयातील, अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सार्वजनिक आरोग्‍य विभागाअंतर्गत मिरज येथे 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्‍णालय बांधकाम करण्यास 46 कोटी 73 लाख इतक्‍या रकमेस प्रशासकीय मान्‍यता प्राप्त आहे. उर्वरित सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही आवश्यक निधी देऊ. ग्रामीण व शहरी भागातील महिला व नवजात शिशुंना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे हे रूग्णालय लवकरात लवकर उभे करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तसेच मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास 25 कोटी रूपयांची एम. आर. आय. मशीन व सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयास दहा कोटी रूपयांचे सी. टी. स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे यांनी मल्टीपर्पज हॉस्पिटल सिव्हील हॉस्पिटलला जोडण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याची केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे. यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून घेवू, असे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते महसूल विभागाकडून आरोग्य विभागास रूग्णालयासाठी जागा हस्तांतरीत केल्याची कागदपत्रे देण्यात आली.

खासदार संजय पाटील म्हणाले, मिरज येथे महिला व बालकांसाठी रूग्णालय आवश्यक होते. ही गरज आता पूर्ण होत असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

डॉ. नर्गिस सय्यद यांनी मिरज येथे महिला व नवजात शिशु रूग्णालयाची उभारणी होत असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.

या रुग्‍णालय बांधकामाकरिता मिरज येथील किसान चौकातील जवळपास 5209 चौ. मीटर इतकी जागा महसूल विभागाकडून आरोग्य विभागास हस्तांतरित केली आहे. या जागेमध्‍ये 100 खाटांचे सुसज्ज महिला व नवजात शिशु रुग्‍णालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्‍यात येणार आहे. 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्‍णालय उभारणी केल्‍यामुळे ‍स्त्रियांना स्‍वतंत्र आंतररुग्‍ण व बाह्यरुग्‍ण विभाग, गरोदरपणातील तपासणी, प्रसुती पूर्व व प्रसुती पश्‍चात उपचार, जोखमीच्‍या गरोदर मातांची तपासणी व उपचार, गरोदर माता व स्‍तनदा माता यांना केंद्र शासन व राज्‍य शासनामार्फत देण्‍यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळणार आहेत. नवजात व शिशु बालकांना आय.सी.यु/ एन.बी.एस.यु / एन.आय.सी.यु व एस.एन.सी.यु अंतर्गत बालरोग तज्ञांमार्फत तपासणी,उपचार व शस्‍ञक्रिया इ. सेवा दिल्‍या जाणार आहेत. तसेच, महिला व बालकांना आवश्‍यक औषधौपचार दिला जाणार आहे. तसेच अत्‍याधुनिक उपकरणे साहित्‍य सामग्री उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.

रुग्‍णालयामध्‍ये वैद्यकीय अधिकारी / विशेषतज्ञ, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्‍ध होणार असल्यामुळे भविष्‍यात महिलांना बाळंतपणापूर्वी व नंतर योग्‍य उपचार व नवजात बालकांना अत्‍यावश्‍यक असणारे उपचार तसेच संदर्भसेवा मिळण्‍यासाठी त्‍याचा फायदा होणार आहे. तसेच जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्‍णालयातील गंभीर महिला व नवजात बालकांवर संदर्भ सेवेव्‍दारे उपचार करणे सुलभ होणार आहे. या ठिकाणी शासनाने वेळोवेळी सुरु केलेल्‍या योजनेचा लाभ देणे व सर्व राष्‍ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे सोयीचे होणार आहे. त्‍याअनुषंगाने संस्‍थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविणे देखील सोयीचे होईल. या सर्व सोयी-सुविधांमुळे सांगली जिल्‍हा, मिरज पूर्वभागातील तसेच नजीकच्‍या कोल्‍हापूर, सोलापूर जिल्‍हा व कर्नाटक राज्‍यातील सीमाभागातील महिला व नवजात बालकांनादेखील त्‍याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here