ठाणे येथील ‘द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क’ ओळखले जाणार ‘नमो- द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क’ नावाने – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
10

ठाणे, दि. 8 :-  आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची ठरेल, अशी ग्रॅण्ड सेंट्रल पार्क ही संकल्पना ठाण्यात प्रथमच साकारली आहे. हे उद्यान आबालवृद्धाना आनंद देणारे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाणे येथे केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या आणि कल्पतरू समूहाने विकसित केलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचे लोकार्पण झाले. हे “द ग्रॅंड सेंट्रल पार्क” आता “ नमो- द ग्रॅंड सेंट्रल पार्क” या नावाने ओळखले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

आमदार संजय केळकर यांनी सुचविल्याप्रमाणे या उद्यानाला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात येईल. त्यामुळे या उद्यानाची ओळख ‘नमो द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क’ अशी होईल.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोलशेत भागात 20.5 एकर जागेवर साकारलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कच्या लोकार्पण सोहळ्यास शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार श्री. केळकर, आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मिताली संचेती, कल्पतरू डेव्हल्पर्सचे मोफतराज मुनोत आदी उपस्थित होते.

लोकार्पणानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उद्यानाची पाहणी केली. त्यातील संकल्पनेवर आधारित विविध देशांची उद्याने, लहान मुलांसाठी असलेली खेळणी, जागा यांची पाहणी केली. क्यू आर कोड स्कॅन करून झाडाविषयी माहितीही जाणून घेतली.

राज्यातील हे सगळ्यात मोठे उद्यान आहे. त्याच्या उभारणीत कुठेही गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही. सुमारे 3 हजार 500 झाडे या उद्यानात आहेत. आणखी झाडांचे नियोजन करावे. तसेच, त्याचे व्यवस्थापनही नेटकेपणाने व्हावे. कल्पतरू डेव्हल्पर्सने टीडीआरच्या माध्यमातून हे उभे केले आहे. महानगरपालिकेचा एकही पैसा खर्च न करता हे उद्यान उभे राहिले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

अर्बन फॉरेस्ट कसे असू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे ऑक्सिजन पार्क आहे. कांरजे, तलाव यांचा अनुभव सगळ्यांना घेता येईल. त्याच जोडीने मिनिएचर पार्क उभे करण्यात येणार आहे. त्यात जगभरातील आश्चर्यांच्या मोठ्या प्रतिकृती येथे पाहता येतील. सगळ्यांनाच परदेशात जाता येत नाही. त्यामुळे त्यांनाही तो आनंद या मिनिएचर पार्कमध्ये घेता येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

सेंट्रल पार्क उत्तम पर्यटन स्थळ होईल, असा विश्वास आमदार श्री. केळकर यांनी व्यक्त केला.

ठाण्यात व्हावे स्नो पार्क

ठाण्यात या सेंट्रल पार्क पाठोपाठ एक स्नो पार्क (बर्फ उद्यान) ही विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. हे स्नो पार्क ही ठाणेकरांसाठी मेजवानी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वंकष स्वच्छता मोहिमेत अंतर्गत रस्तेही घ्यावेत

मुंबईप्रमाणेच ठाण्यातही सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यात मुख्य रस्ते घेतले आहेत. आता त्यात अंतर्गत रस्तेही घ्यावेत. डेब्रिज, माती पूर्ण काढावी आणि ठाण्यात कुठेही कचरा सापडणार नाही, अशी स्वच्छता करावी, असे  निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here