मुंबई, दि. ९ :- विधि विधान शाखेतील राज्यातील दहा विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम शासनाने राबविला होता. विधि विधान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथमच केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला असून, संविधान व कायद्याच्या आधारे मार्गक्रमण केल्यास आयुष्यात यशप्राप्ती होणार असल्याचे सचिव सतीश वाघोले यांनी सांगितले.
मंत्रालयात विधि व न्याय विभागाच्या विधि विधान शाखेतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, यासाठी विधि विधान शालखेतील १० मुलांची इंटर्नशीपसाठी निवड करण्यात आली होती. या सहा आठवड्याच्या इंटर्नशीप नंतर समारोप कार्यक्रमाचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी सचिव श्री. वाघोले विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP २०२०) अंमलबजावणीमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये इंटर्नशिप हा महत्वाचा भाग असून विधि विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप लागू करण्यात आली आहे. विधि विधान विषयक कार्यपद्धतीची माहिती कोणत्याही विधि महाविद्यालयात शिकवली जात नाही किंवा अभ्यासक्रमाचाही भाग नाही. कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.
विधि विधान शाखेत कायदे तयार करणे, कायद्यांमध्ये सुधारणा करणे, अध्यादेश प्रख्यापित करणे, विधानमंडळात विधेयके पारित करण्याची कार्यपध्दती अधिनियमांखालील नियम तयार करणे, अधिसूचना काढणे आदी कामकाज चालते. याची माहिती विद्यार्थ्यांना या कालावधीत देण्यात आली. मंत्रालय, विधानभवन, राजभवन तेथे चालणारे कामकाज याची माहिती दिली.
सचिव श्री.वाघोले म्हणाले की, कायदा तयार करताना तो इतर कायद्याला अधिक्षेप करणार नाही, कोणतीही अस्पष्टता राहणार नाही, त्याचे नियम स्वयंस्पष्ट व्हावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोर पालन नवीन कायदा तयार करताना करावे लागते. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजुन सांगण्याचे काम या कार्यकाळात करण्यात आले. राजभवन, विधानभवन आणि मंत्रालयातील विधि संदर्भातील कार्यपद्धती त्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कायदे तयार करण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रिया समजून घेता आली. कायद्याकडे तसेच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. शासकीय कामकाज , कायदे आणि त्यांची अंमलबजावणी , त्याचे गांभीर्य समजून घेतला आले. या अनुभवाचा भविष्यात नक्कीच उपयोग होईल, असे विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितले.
यावेळी सहसचिव मुग्धा सावंत, सुप्रिया धावरे, मकरंद कुलकर्णी, उपसचिव किरण पाटील, नरेश पुसनाके, पुष्पेंद्रसिंग राजपूत, अवर सचिव सोनाली पाखरे, अश्रफ पटेल, भूषण भेंडारकर यांच्यासह विधि व न्याय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
०००
श्रद्धा मेश्राम/ससं/