कोल्हापूर जिल्ह्यातील रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत – मंत्री संदिपान भुमरे

0
6

मुंबई, दि. 14 : कोल्हापूर जिल्ह्यातील रोजगार हमीची मंजूर असलेली कामे तातडीने सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिल्या.

रत्नसिंधु या शासकीय निवासस्थानी आज कोल्हापूर जिल्ह्यातील रोजगार हमीच्या कामाबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह रोजगार हमी विभागाचे अधिकारी, कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकारी आदी उपस्थित होते.

रोजगार हमीची कामे सुरू करण्यामध्ये काही अडचणी असल्यास त्याविषयी वरिष्ठांना माहिती द्यावी, अशा सूचना देऊन मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीची कामे सुरू आहेत. यामध्ये ग्रामीण रस्ते, पाणंद रस्ते ही कामे प्रामुख्यांने मंजूर करण्यात आली आहेत. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांची जास्तीत जास्त कामे केली जावीत ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातही मंजूर असलेली रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत. कामे करण्यामध्ये काही अडचण असल्यास वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढावा. जास्तीत जास्त कामे लवकरात लवकर मार्गी लागतील या दृष्टीने काम करावे.

राज्यात रोजगार हमीची कामे करत असताना कोणत्याही अडचणी येणार नाही, अशा पद्धतीने शासन काम करत आहे. त्यासाठी विविध शासन निर्णयांच्या माध्यमातून रोजगार हमीची कामे सोप्या पद्धतीने करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. रोजगार सेवकांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना, ग्रामसेवकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. रोजगार हमी योजनेसाठी 6 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here