छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका) :- घृष्णेश्वर मंदिराजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव, त्यातील संगित कारंजे, मालोजीराजे भोसले यांची गढी या ऐतिहासिक वास्तुंचे सुशोभिकरण लवकर पूर्ण करुन तसेच देखभाल, दुरुस्ती, कार्यान्वयन या प्रक्रिया पूर्ण करुन या वास्तू पर्यटकांना खुल्या कराव्या,असे निर्देश केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकल्पाचा आढावा डॉ. कराड यांनी घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, घ्रुष्णेश्वर मंदिर व्यवस्थापन इ. अधिकारी उपस्थित होते.
हा प्रकल्प उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबविण्यात येत आहे. त्यात वेरुळ येथील घ्रुष्णेश्वर मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव येथे संगीत कारंजे तसेच ध्वनी व प्रकाश सादरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामांच्या उर्वरीत तांत्रिक पूर्तता करुन हा प्रकल्प पर्यटकांना खुला करावा. तसेच मालोजीराजे यांच्या गढीचे सुशोभिकरण पूर्ण करावीत. ही कामे पुरातत्व विभागाच्या निर्देशाप्रमाणे व त्यांच्या मान्यतेने पूर्ण करण्यात यावी व पर्यटकांना खुली करावी, असे निर्देश डॉ. कराड यांनी दिले.
०००००