‘बॅंक मित्र’ आर्थिक विकासाचे आधार – केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका):- गोरगरीब, दुर्गम-ग्रामीण भागातील लोकांपर्यंत बॅंकांच्या विविध सेवा पोहोचवून त्यांचे आर्थिक समावेशन करणारे बॅंक मित्र हे आर्थिक विकासाचे आधार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज येथे केले.

जिल्ह्यातील बॅंक मित्रांशी आज ते संवाद साधत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीस कॅनरा बॅंकेचे क्षेत्रिय प्रबंधक बिनय कुमार,  जिल्हा अग्रणी बॅंकेचे मिलिंद केदारे, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे गणेश कुलकर्णी,  देवगिरी बॅंकेचे किशोर शितोळे, संजय खंबाते तसेच विविध बॅंकांचे क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले की, देशातील गोरगरिब हा बॅंकांशी जोडला जावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध योजना सुरु करुन त्यांना बॅंक खाते सुरु करण्याची सुविधा दिली. जनधन योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून लोकांना बॅंकांशी जोडण्यात आले. त्यातून मोठ्या प्रमाणावर लाभ झाला. देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकारत असतांना ग्रामीण भागात आर्थिक साक्षरताही आली पाहिजे असा यामागे दृष्टिकोन आहे.  हे सगळे प्रयत्न बॅंक मित्रांमुळेच यशस्वी होत आहेत, असे त्यांनी सांगितले. बॅंक मित्रांचे कमिशन वाढले पाहिजे व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठीही आपण प्रयत्न करु, असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बॅंक मित्रांना डॉ. कराड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

०००० ०