मुंबई, दि. 21 : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर जि. सांगली येथे उभारण्यासाठी विद्यापीठ कार्यकारी समितीचा अहवाल सकारात्मक आहे. तसेच शासकीय जागाही उपलब्ध आहे. खानापूर येथे विद्यापीठाच्या उपकेंद्र उभारणीमुळे सातारा, सांगली या भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार असून उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित उपकेंद्र आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सुहास बाबर आदी उपस्थित होते. तर दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू दिगंबर शिर्के, कुलसचिव व्ही. एन शिंदे, प्राचार्य व्ही. एम पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
विद्यापीठाने खानापूर येथील उपकेंद्राचा सर्वसमावेशक प्रस्ताव पाठविण्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणाले, खानापूर येथे शासकीय गायरान जमिन उपलब्ध आहे. तसेच जलसंपदा विभागाची जमीनही आहे. आवश्यकता असल्यास जलसंपदा विभागाच्या जमिनीचाही उपयोग करता येईल. सांगली येथे तात्पुरते उपकेंद्र सुरू न करता खानापूर येथेच कायमस्वरूपी उपकेंद्र सुरू करावे. प्रस्ताव तातडीने सादर करून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता घेण्यात येईल. तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीसुद्धा चर्चा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
०००
निलेश तायडे/विसंअ/