मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्या उद्घाटन

मुंबई,दि. २३ : राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उद्घाटन दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर मोशी येथे होणा-या या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, उपसभापती निलम गो-हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणा-या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे’ आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे.

देशाची संरक्षण दले, संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसेच यातील खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

००००

मनीषा सावळे/विसंअ