प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण; ग्रामविकास मंत्री व पालकमंत्र्यांकडून पाहणी

यवतमाळ, दि.27 (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.28 फेब्रुवारी रोजी येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी पुर्ण झाली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमस्थळाला भेट देऊन पाहणी केली व तेथेच तयारीचा आढावा घेतला.

यावेळी आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.निलय नाईक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॅा.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्रिमहोदयांनी स्टेज, मंडप, बैठक व्यवस्था, सुरक्षा, स्क्रीन, साऊंड आदींची पाहणी केली. त्यानंतर येथेच सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला. जी कामे शिल्लक असतील ती आज सायंकाळपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंडपात उभारण्यात आलेल्या कक्षांमध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी, महिलांकरीता फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

प्रत्येक गावातून बसमध्ये कार्यक्रमस्थळी येणाऱ्या महिलांसाठी बसमध्येच खाद्य पदार्थ, पिण्याचे पाणी तसेच त्यांच्यासोबत समन्वयक असावे. महिलांची प्रवासादरम्यान गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. महिलांना सुरक्षित कार्यक्रमस्थळी आणण्यासोबतच त्यांचा परतीचा प्रवास देखील सुरक्षितपणे होईल, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या.

दोनही मंत्रिमहोदयांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नेमन्यात आलेल्या समिती प्रमुखाकडून त्यांच्या तयारीचा आढावा घेतला. व्यवस्थेत कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही तसेच सोपविलेली कामे वेळेत पुर्ण होतील, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

000