विविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याची पायाभरणी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

यवतमाळ, दि. 28 :  विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या  10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी गरीब, युवक, शेतकरी व महिला या घटकांच्या सशक्तीकरणासाठी व्यापक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासप्रक्रियेला गती मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रू. व महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे 6 हजार 900 कोटी रू. चे वितरण, तसेच राज्यातील सुमारे पाच हजार कोटी रू. निधीतून रस्ते, रेल्वे व सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन, तसेच यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही  प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भावना गवळी, खा.हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नीलय नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार,डॉ. संदीप धुर्वे, नामदेव ससाणे, इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, गत 10 वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीने देशात पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला आहे. गरीब, नवयुवक, शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल. हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनांतून शेतक-यांसाठी सिंचन, गरीबांसाठी घरे, महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसाह्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी थेट हस्तांतरित करण्यात येत आहे. ग्रामीण विकासासाठी हर घर जल, पीएम किसान निधी, लखपती दीदी योजना, स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण आदी विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला.

प्रधानमंत्र्यांनी भाषणाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. मराठी व बंजारा भाषेतही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मागील दशक देशासाठी सुवर्णकाळ ठरला असून त्याचे शिल्पकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. महिला, शेतकरी, गरीब आणि तरुण या समाजाच्या चार स्तंभांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले असून, ‘नेशन फर्स्ट’च्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत.   महाराष्ट्र संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासमवेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,  शेतकरी सन्मान योजनेत 4 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, मोदी आवास योजनेत घरांमध्ये महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल. साडेपाच लाख महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे   लक्ष्य आहे. त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आमचा निर्धार आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी झाल्यापासून महिलांसाठी अनेक महत्वाच्या योजना सुरू झाल्या. त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि कर्ज देण्यात आले आहे. पालकमंत्री श्री. राठोड, खा. गवळी, आमदार डॉ. धुर्वे यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना बंजारा समाजाची पगडी, तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.

रस्ते व महामार्गांचे लोकार्पण

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध रस्ते, महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ व लाभ वितरण झाले. त्यात वरोरा – वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस, वणी, तडाळी, पडोळी यांसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांना फायदा मिळेल. सुमारे 378 कोटी रू. निधीतून सलाईखुर्द – तिरोरा महामार्गावरील 42 कि.मी. काँक्रिटीकरणामुळे गोंदिया ते नागपूर प्रवासाच्या वेळेत एक तासाची कपात होऊन नागझिरा अभयारण्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. सुमारे 291 कोटी रू. निधीतून साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचेही लोकार्पण झाले.

सिंचन प्रकल्प

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत 1 हजार 683 कोटी रू. निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील 6 प्रकल्पांचे लोकार्पण झाले. या प्रकल्पातून 2.41 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 1 हजार 180 कोटी रू. निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांमुळे 51 हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

रेल्वेसेवेचा शुभारंभ

अहमदनगर – बीड-परळी रेल्वे मार्गावर 645 कोटी रू. निधीतून न्यू आष्टी – अमळनेर टप्प्याचे व अमळनेर – न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ झाला. त्याचा लाभ बीड जिल्ह्यातील नागरिक व कामगार वर्गाला मिळेल. सुमारे 675 कोटी रू. निधीतून वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा -कळंब  या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ झाला. त्यामुळे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील दळणवळण गतिशील होईल. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच ब्रॉडगेज रेल्वे सेवा सुरू झाली आहे.

महिला सशक्तीकरण अभियान

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 5.50 लाख महिला बचत गटांना 825 रू. कोटी फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. स्वयंसहाय्यता समूहांना अतिरिक्त खेळते भांडवल देण्यासाठी 913 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली. आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात 1 कोटी आयुष्मान कार्डचे वितरण होत असून, योजनेच्या 3 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कार्डचे वितरण करण्यात आले.

इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभही झाला. त्यात येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यात येणार असून,  2.5 लाख लाभार्थ्यांना रु. 375 कोटींच्या पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.

 पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता थेट बँक खात्यात

पीएम किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरित झाले. देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रुपयांचे, तसेच राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 1 हजार 969 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. आधार लिंक बँक खात्यात लाभांचे डिजिटल हस्तांतरण करण्यात आले. नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यात राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 3 हजार 800 कोटी रुपयांचा लाभ मिळाला.

०००