मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय साहित्याचे वितरण, प्रशिक्षणाचे उद्धाटन

मुंबई, दि. २९ :- मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पुणे, ठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यातील सावरोली येथील ३० विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.

कोपरन रिसर्च लॅबोरेटरीज, सँडोज प्रायव्हेट लिमिटेड,  एमेरिकेअर्स  इंडिया फाऊंडेशन यांच्या वतीने सामुदायिक वैद्यकीय साहित्याचे तसेच ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

साहित्य वितरण व उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले यांच्यासह  कोपरन लॅबोरेटरीजचे सुरेंद्र सोमाणी, वरूण सोमाणी, अजित जैन, राकेश दोशी, संजय दोशी, सुनील सोधानी, ललित राजपुरोहीत, श्रीमती व्ही.पी.एस. नायर,  सँडोजचे सुधीर भांडारे, समीर कोरे, पंकज गुप्ते, अजित जांभळे, लुसी दास यांच्यासह अमेरिका केअरचे अनिर्बण मित्रा, अशोक राणा, गुरुप्रसाद जानवेकर उपस्थित होते. तसेच या सर्व कामात सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी वाशिमच्या अस्मिता मल्टीपर्पज एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज भगत, वैशाली भगत, स्वराज्य सेवा वाघमोडे प्रतिष्ठानच्या डॉ. राजकुमार वाघमोडे, अक्षय पाटील यांच्यासह  सावरोलीचे सरपंच संतोश बैलमारे, खोपोलीच्या वायएके पब्लिक स्कूलच्या उपप्राचार्या पूनम गुप्ता , सहकार देवगिरी फाऊंडेशनचे अनंत अंतरकर, डॉ. राजेंद्र जोशी उपस्थित होते.

प्रत्येक उत्सव मंडळाच्या माध्यमातून किमान पाचशे ते सहाशे  कुटुंबांना तसेच दहा ते बारा चाळी, सोसायट्यांमधील नागरिकांपर्यंत वैद्यकीय साहित्य पोहोचविण्यात येणार आहे.  यासाठी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक उत्सव मंडळे, को-ऑप सोसायटी यांना एकूण २९१ संच तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड एकूण ७९ संच, रायगड जिल्ह्यातील खालापूर व बिरवाडी, महाड येथे १२ वैद्यकीय साहित्य संच देण्यात आले. आठवी, नववी, दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी HTML व Coding चे बेसिक प्रशिक्षण मिळाल्यास पुढील भविष्यासाठी उपयोगी ठरू शकेल. शहरी भागातील मुलांसोबत स्पर्धेत उतरताना आत्मविश्वास तयार होईल. यासाठी  रायगड मधील सावरोली, उंबरे, ता.खालापूर, बिरवाडी, ता. महाड येथील ३० विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या साहित्य वितरण कार्यक्रमाचे संयोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख तथा राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, समन्वयक मनोज घोडे-पाटील, सतिश जाधव आदींनी केले.