अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्र भाषा अभ्यास, संवर्धन, संशोधनाचे केंद्र बनावे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

0
6

            मुंबई, दि. 5 :-  प्राचीन, समृद्ध आणि वैभवशाली पारसी- झोराष्ट्रीयन संस्कृतीच्या अध्ययन व संशोधनासाठी मुंबई विद्यापीठात अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्राची स्थापना केली जात असून या केंद्राला केंद्र सरकारमार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. मुंबई विद्यापीठात  उभारण्यात येत असलेली अभ्यास केंद्राची इमारत भाषा अभ्यास, भाषा संवर्धन व  संशोधनचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा केंद्रीय महिला व बाल विकास आणि अल्पसंख्याक कार्य मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केली.

            मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात उभारण्यात येत असलेल्या या अभ्यास केंद्राच्या  इमारतीचे भूमिपूजन  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उदवाडाचे प्रधान पुजारी वडा दस्तूरजी खुर्शेद दस्तूर, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नादिर बुर्जोरजी गोदरेज, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव जितेंद्र सिंह राजे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

            श्रीमती इराणी म्हणाल्या, नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व दिले आहे. यामुळे भाषांचा अभ्यास करणे,भाषेचे जतन व संवर्धन करण्यास मदत होणार आहे. मुंबई विद्यापीठाने अवेस्ता पहलवी भाषा अभ्यास केंद्र सुरू करून  भाषेचा अभ्यास व भाषा संवर्धनामध्ये योगदान दिले त्याबद्दल केंद्रीय मंत्री श्रीमती इराणी यांनी विद्यापीठाचे आभार मानले.

            महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून महाराष्ट्र शासन  नेहमीच नवनवीन उपक्रम सुरू करण्यात पुढाकार घेत आहे. महाराष्ट्र राज्याच्या नव नवीन उपक्रमाला  केंद्र सरकार आवश्यक मदत करेल. त्या म्हणाल्या पारशी समाज हा संख्येने कमी आहे. या समाजाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले,  भाषा समाजाचा मूळ पाया असून भाषेबरोबरच शिक्षण समाजात स्थिरता आणि सन्मानाचा मार्ग दाखवते. यासाठी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी त्या संस्कृतीतील भाषांचे जतन आणि संवर्धन करणे  महत्त्वाचे आहे. अवेस्ता – पहलवी भाषेचा संस्कृत भाषेशी जवळचा संबंध असून मुंबई विद्यापीठाने अवेस्ता-पहलवी या झोरोस्ट्रियन लोकांच्या प्राचीन आणि पवित्र भाषा अभ्यासण्याचा सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. या अभ्यास केंद्राला राज्य शासनाच्यावतीने आवश्यक मदत केली जाईल. एका वर्षात या केंद्राची देखणी इमारत पूर्ण करण्यात येईल, तो पर्यंत हे अभ्यास केंद्र अन्य ठिकाणी सुरू करावे,  असे ते म्हणाले.

            श्री. पाटील म्हणाले, भाषा या  सामाजिक-सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनांच्या प्राथमिक वाहक असून  भारत सरकारने संस्कृत, पाली आणि पर्शियन या सारख्या प्राचीन भारतीय भाषांमधील उपलब्ध साहित्याचा शोध घेण्यावर भर दिला आहे.

            यावेळी वडा दस्तूरजी खुर्शेद दस्तूर आणि  गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नादिर बुर्जोरजी गोदरेज यांनी मनोगत व्यक्त केले.

            प्रारंभी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी स्वागत करून अभ्यास केंद्राविषयी प्रास्ताविकात माहिती दिली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here