चंद्रपूर, दि. 5 मार्च : ‘वन से धन’ तक जाण्यासाठी वनक्षेत्रात मोठी शक्ती आहे. अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी चंद्रपूरचे काष्ठ पाठविण्यात आले आहे. भविष्यातील 1000 वर्षाचा विचार करून अयोध्येतील राममंदिर बांधण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिरासाठी पाठवलेले काष्ठ हे 1000 वर्ष टिकू शकते, असे संशोधनात सिद्ध झाले आहे, असे राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
ताडाळी एम.आय.डी.सी. येथे प्रगत काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्राचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी बांबू विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, जिल्हाधिकारी विनय गौडा, बांबू विकास महामंडळाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुमित कुमार, श्रीनिवास राव, संजीव रॉय, वनविभागाचे उपसंचालक नंदकिशोर काळे, वन अधिकारी प्रशांत खाडे, पर्यटन विकास महामंडळाचे प्रकाश धारणे आदी उपस्थित होते.
चंद्रपूरचे काष्ठ हे केवळ देशातच नव्हे तर जगात सर्वोत्कृष्ट आहे, असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बांबू विकास महामंडळाच्या माध्यमातून अयोध्येचे राम मंदिर तसेच नवीन संसद भवनाच्या इमारतीकरिता चंद्रपूरचे काष्ठ पाठवण्यात आले आहे. बांबू हा आधुनिक कल्पवृक्ष असून रोजगार निर्मितीसाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था चंद्रपुरात सुरू करण्यात आली आहे. ताडाळी एम.आय.डी.सी.मध्ये फर्निचर क्लस्टरसाठी 10 एकर जागा उपलब्ध झाली आहे. या क्लस्टरला विकसित करण्यासाठी राज्यासोबतच केंद्राचा सुद्धा निधी मिळू शकतो, त्या दृष्टीने बांबू विकास महामंडळाने प्रस्ताव तयार करावा.
पुढे वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सुतार समाजाला देवाने विशेष देणगी दिली आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर येथील फर्निचर अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये सुद्धा पोहोचवण्याची आपली क्षमता आहे. बांबू विकास महामंडळ ही केवळ नफा कमवणारी कंपनी नसून सामाजिक दायित्वातून रोजगार देणारी कंपनी करण्याचा आपला प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा केवळ पुस्तकी ज्ञानात न राहता जनतेच्या मनावर आपण केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम कसा होऊ शकतो, या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी फर्निचर या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून निवडावे. विद्यार्थ्यांना या विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने फर्निचर क्लस्टर या उपक्रमाची कन्सेप्ट नोट अतिशय चांगली बनवणे आवश्यक आहे. मनातला विचार कागदावर येणे, कागदावर लिहिलेला विचार संगणकामध्ये उतरवणे आणि संगणकातील उत्कृष्ट कलाकृती फर्निचरमध्ये रूपांतरित करण्यासाठी आपल्या कल्पक बुद्धीचा विद्यार्थ्यांनी वापर करावा.
पुढील विश्वकर्मा जयंतीच्या दिवसापर्यंत प्रगत काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्रात विश्वकर्मांचा पुतळा बसवण्याची नियोजन करण्यासाठी बांबू विकास महामंडळाने कामाची गती वाढवावी. तसेच गावकऱ्यांनी सुद्धा या फर्निचर क्लस्टरचा उपयोग घ्यावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्राची प्रमुख उद्दिष्टे
प्रगत काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्रात काष्ठ आधारीत, बांबु आधारीत आणि अकाष्ठ वनोपज आधारीत उद्योगांच्या विकासासाठी सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. या प्रकल्पात क्लस्टरची ओळख करणे, क्लस्टरमधील स्थानिक कारागिरांची क्षमता बांधणी करणे, त्यांना सुविधा केंद्र उपलब्ध करून देणे आणि स्थानिक कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध करणे या घटकांचा समावेश आहे. सोबतच या केंद्रात काष्ठ आधारीत फर्निचर, दरवाजे, चौकट, पॅलेट्स, कलाकृती इत्यादी उत्पादनाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे, त्यांच्याशी निगडीत लघु उद्योगांचे सक्षमीकरण व कौशल्य विकास करणे, काष्ठ उद्योजकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे उत्पन्न वाढविणे व तयार उत्पादनाच्या विपणनासाठी पुरवठा साखळी तयार करणे, रिटेल शोरुमच्या माध्यमातून शेवटच्या उपभोक्त्यापर्यंत या वस्तु पोहचविणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.
कौशल्य विकासासाठी दरवर्षी 100 स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण
चंद्रपूर येथील या उपक्रमासाठी 50 कोटी एवढा निधी गुंतविला जाणार असून येथे दरवर्षी 1 लक्ष घनफूट लाकडावर प्रकिया करण्याची क्षमता आहे. तसेच दरवर्षी 50 हजार पर्यंत मनुष्य दिवस निर्माण होतील. कौशल्य विकासासाठी दरवर्षी जवळपास 100 स्थानिक काष्ठ कारागिरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उपक्रमात काम करणारे तसेच प्रशिक्षण प्राप्त करणा-या स्थानिक कारागिरांना त्यांचा स्वत:चा उद्योग सुरू करण्याची सूवर्णसंधी यामुळे प्राप्त होणार आहे.
सुतार काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार
वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सुतार काम करणारे सतीश मानुसमारे, महादेव वांढरे, बबनराव राखुंडे, जगन्नाथ गहूकर, सुरेश रासेकर आणि सुनीता पिंपळकर यांचा तसेच एस. आर. एम. सोशल वर्क कॉलेजच्या प्राचार्य जयश्री कापसे – गावंडे आणि डॉ. सुभाष गिरडे यांच्यासह अनुराग चांदेकर, वैष्णवी ठाकरे, नीलिमा कारमेंगे या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
000