मुंबई, दि. ६ : राज्य शासनाच्या दर्शनिका (गॅझेटियर) विभागाने संपादित केलेल्या ‘महाराष्ट्रः गोंड समुदाय’ या विशेष प्रकाशनाचे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ७ मार्च) चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृह येथे सकाळी ११ वाजता होत आहे.
भारतातील आदिवासी जमातींपैकी संख्येने सर्वांत मोठ्या जमातींपैकी एक अशी ही गोंड जमात आहे. थेट ओरिसापासून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश पर्यंत ती पसरली असून गोंड जमातींनी व्याप्त प्रदेशाला ‘गोंडवाना’ हे नाव प्रचलित आहे. महाराष्ट्रात, विदर्भ विभागात प्रामुख्याने गोंड वस्ती असून विदर्भातल्या गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि अल्प प्रमाणात नांदेड, तसेच अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये गोंडांची वस्ती पाहावयास मिळते तर गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळात त्यांची दाट वस्ती आहे.
चंद्रपूर व अन्य अनेक जिल्ह्यात या एका शुर वंशजांचे वास्तव्य, राज्य कारभाराच्या ऐतिहासिक पाऊलखुणा पहावयास मिळतात तसेच यांचे वेगळेपण देखील अनुभवायास मिळते. ‘महाराष्ट्र : गोंड समुदाय’ या ग्रंथात त्यांच्या सामाजिक संरचनेच्या विविध पैलुवर प्रकाश टाकून महत्त्व अधोरेखित करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न केला आहे. मानववंशशास्त्राचा काहीसा आधार घेऊन सामाजिक स्थिती, धार्मिक जीवन, परंपरा, चालीरीती तसेच सांस्कृतिक पैलु, राजघराण्याचा इतिहास उलगडण्यात आला आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्याशिवाय अन्य राज्यात देखील यांचे ऐतिहासिक वास्तव्य याचाही परिचय करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ग्रंथाचे लेखन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. शाम कोरेटी यांनी केले आहे. मानववंशशास्त्राआधारे या ग्रंथातील काही लेखन श्रीमती आरती नवाथे (पुणे) यांनी केले आहे. तर तज्ज्ञ तपासणी डॉ. एस. जी. देवगांवकर व डॉ. शैलजा देवगांवकर यांनी केली आहे.
गोंड – मानववंशीयशास्त्र अभ्यास, गोंडांची सामाजिक स्थिती, गोंडांचे धार्मिक जीवन, गोंडांचे सांस्कृतिक पैलू, मध्य प्रदेशच्या इतिहासातील गोंड, गोंड कालीन किल्ले, परिशिष्ट, छायाचित्रे यांचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे.
000
दीपक चव्हाण/विसंअ/