शासनाकडून बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे काम निरंतर सुरु राहील – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

ठाणे, दि.7(जिमाका):- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासनातर्फे मॉडेला मिल कपाऊंड, वागळे इस्टेट, चेक नाका, ठाणे पश्चिम-४००६०४ येथे दि.०६ व 7 मार्च २०२४ या दोन दिवसाच्या कालावधीत “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काल ६ मार्च रोजी या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. कोकण विभागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगार देण्याचे काम निरंतर सुरु राहील, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज येथे दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज या “नमो महारोजगार” मेळाव्याचा सांगता कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार निरंजन डावखरे, कौशल्य विकास आयुक्त निधी चौधरी, कौशल्य विकास संचालक योगेश पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिगंबर दळवी, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार, कोकण विभागीय उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, ठाणे कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक संचालक संध्या साळुंखे, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर आदी मान्यवरांची उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हे बेरोजगार तरुणांसाठी संवेदनशील आहेत. त्यांच्या सहकार्यानेच ठाणे येथे हा दोन दिवसीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करणे शक्य झाले. या दोन दिवसात मोठ्या संख्येने बेरोजगार युवक-युवतींनी आपली नोंदणी केली. या दरम्यान पात्र उमेदवाराची निवड करुन काहींना लगेचच निवडपत्रही दिले. या मेळाव्याच्या आयोजनासाठी सर्वांनीच मोलाचे सहकार्य केले. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विद्याविहार येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे ऑनलाईन लोकार्पण आणि कोपरी येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचालित संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे उदघाटन संपन्न झाले. या अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या दोन्ही कौशल्य विकास प्रबोधिनी देशातील पहिल्या प्रबोधिनी आहेत. जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींना या प्रबोधिनीच्या माध्यमातून विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून पुढे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगारही उपलब्ध करुन दिला जाणार आहे. कौशल्य विकास आणि रोजगार उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे हे काम यापुढेही असेच निरंतर सुरु राहील.

या मेळाव्यासाठी एकूण 66 हजार 226 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या मेळाव्यात दि.०६ मार्च २०२४ रोजी 310 उद्योजकांच्या उपस्थितीत 22 हजार 697 उमेदवारांची मुलाखती झाल्या. यापैकी 8 हजार 985 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून 1 हजार 186 असे मिळून एकूण 10 हजार 171 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. तसेच दि.०7 मार्च २०२४ रोजी 289 उद्योजकांच्या उपस्थितीत 16 हजार 928 उमेदवारांची मुलाखती झाल्या. यापैकी 6 हजार 321 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून 1 हजार 37 असे मिळून एकूण 7 हजार 358 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

अशाप्रकारे या मेळाव्यात एकूण 66 हजार 226 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या मेळाव्यात एकूण 599 उद्योजक कंपन्यांची उपस्थिती होती. यांच्यामार्फत एकूण 72 हजार 13 रिक्त पदे उपलब्ध होती. यापैकी 39 हजार 625 उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यापैकी 15 हजार 306 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून 2 हजार 223 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. तसेच प्राथमिक व अंतिम निवड असे मिळून 17 हजार 529 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या उमेदवारांच्या मेळाव्याच्या ठिकाणीच मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर या मेळाव्यात 14 विविध शासकीय महामंडळे सहभागी झाली होती व त्यांच्या माध्यमातून एकूण 2 हजार 620 युवक-युवतींनी स्वयंरोजगाराविषयी माहिती-मार्गदर्शन घेतले, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार यांनी दिली आहे.

समारोप प्रसंगी उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व अधिकारी -कर्मचाऱ्यांचा, जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून दिलेल्या कंपन्यांचा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व अन्य मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

00000000