राज्य शासन उद्योजकांच्या सदैव पाठीशी – पालकमंत्री उदय सामंत

रायगड, दि.07(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने मोठ्या उद्योजकांबरोबर च छोट‌्या उद्योजकांना देखील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. उद्योजकांवर कुठलेही संकट येणार नाही याची राज्य शासन काळजी घेईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. यावेळी श्री.सामंत यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी 2600 कोटी रुपयांचे 17 सांमजस्य करार करण्यात आले.

 पनवेल येथे  आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आ प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी. हरळय्या उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. तसेच राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 यांनी सुचविलेल्या सुधारणाचे अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहे. त्याच धर्तीवर निर्यात व विकासाचे केंद्र  म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत  करुन जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी  रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

समुद्र किनारी असलेल्या जिल्ह्यामध्ये उद्योजक गुंतवणूक करत आहेत. स्थानिक स्तरावर 1 लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे. 50 लाखाच्या प्रोजेक्टला देखील रेड कार्पेट  मिळाले आहे. छोटे व स्थानिक उद्योजक शासनाच्या दृष्टीने महत्वाचे  आहेत. अटल सेतूमुळे रायगड जिल्ह्यात पायाभूत सोयी-सुविधांचा विकास होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ,समृध्दी महामार्गामुळे उद्योग वाढीला चालना मिळणार आहे. देशात परकीय गुंतवणूक आणणारे महाराष्ट्र राज्य एक नंबरला आहे असेही श्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोली मध्ये एक हजार एकर जागा लॉइडस कंपनीला दिली असून 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या जिल्ह्यात झाली आहे. गडचिरोली मध्ये जिंदाल, टाटा ने गुंतवणूक केली असल्याने आगामी एका वर्षात उद्योग नगरी म्हणून गडचिरोली ओळखली जाणार आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे 18 ते 19 हजार उद्योजक बनविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. उद्योगाची भरभराट होण्यासाठी उद्योजकांनी उद्योजक तयार करावेत असे केले तर बेरोजगारी दूर होईल.  उद्योजकांवर कुठलेली संकट येणार नाही, याची काळजी शासन घेईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.

000000