वांद्रे येथील सदनिकांच्या चाव्या कर्मचाऱ्यांना सुपूर्द

0
18

मुंबई दि. ११ – वांद्रे पूर्व येथील शासकीय इमारतीतील सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज देण्यात आल्या. या सदनिका लॉटरी पद्धतीने देण्यात येत असून आज ६ शासकीय कर्मचाऱ्यांना सह्याद्री अतिथीगृह येथे प्रतीकात्मकरित्या या चाव्या देण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी आदी उपस्थित होते

यावेळी प्रभा जाधव, मनीषा मोरे, सुरेखा जाधव, सचिन कोळवणकर, जितेंद्र नाईक, प्रमोद कासले या शासकीय कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या.

वांद्रे येथील शासकीय जमिनीवर ९६ एकर जागेत १९५८ ते १९७३ च्या दरम्यान शासकीय वसाहत बांधण्यात आलेली आहे. वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३, व वर्ग-४ नुसार ३७० इमारतीमध्ये एकूण ४७८२ सदनिका आहेत.

वांद्रे वसाहतीमधील एकूण ३७० इमारतीपैकी धोकादायक असलेल्या ६८ इमारती पाडण्यात आलेल्या असून, या इमारतीच्या जागेवर सद्यस्थितीत टप्पा-१ अंतर्गत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरिता इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्या चतुर्थ श्रेणीकरिता एकूण २०१२ निवासस्थानांचे बांधकाम सुरु आहे. सदर निवासस्थाने ही टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. यापैकी पहिल्या टप्यात इमारत क्र.सी-१, ए-१ व बी-२ तसेच बी-१ इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यामध्ये एकूण ६६० निवासस्थाने आहेत. त्यातील बी-१ या इमारतीमधील १२८ सदनिका सावित्रीबाई फुले वसतिगृहासाठी देण्याचे निश्चित झाले आहे.

शासकीय वसाहत वांद्रे पूर्व येथील चतुर्थ श्रेणी इमारत क्र.१,४,६,७ व १० ह्या इमारतीमधील एकूण ५०५ सदनिकाधारकांपैकी ४३५ सदनिकाधारक लॉटरी प्रक्रियेमध्ये उपस्थित होते.  अशा प्रकारे जुन्या इमारतींमधून नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याबाबतची लॉटरी प्रक्रिया पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here