मुंबई, दि. 13 : शासनाची पहिल्या दिवसापासून अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याची भावना आहे. अपघातमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जिल्हा स्तरावरील समितीच्या माध्यमातून अपघात प्रवण स्थळे कमी करावीत. स्पीड गन, कृत्रिम बुद्धिमत्ता या प्रगत तंत्रज्ञानाचा आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीमध्ये उपयोग करून अपघातमुक्त महाराष्ट्र करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
नरीमन पॉइंट येथे परिवहन विभागाच्या 187 इंटर सेप्टर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून या वाहनांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहायक परिवहन आयुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील आदींसह परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
इंटरसेप्टर वाहनांमुळे रस्ता सुरक्षा अधिक सक्षम होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अपघात मुक्त राज्य करण्यासाठी शासनाकडून विभागाला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. रात्री होणारे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक नाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करावी, चालकांमध्ये जागृती करावी, रम्बलर लावावे, चालकाने जास्त कालावधीसाठी सतत वाहन चालवू नये, अशा बाबींवर जनजागृती करून अपघात नियंत्रणात आणावेत. विभागातील अधिकाऱ्यांनी यासाठी जनजागृती करावी, कार्यशाळा घेण्यात याव्यात. अपघात कमी करून लोकांचे जीव वाचविले पाहिजे. एक जीव वाचला, तर एक कुटुंब वाचते. अपघात नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना कराव्यात, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी रस्ता सुरक्षेविषयी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कार्यक्रमा दरम्यान इंटर सेप्टर वाहनांचे निरीक्षण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. या आधुनिक सुविधांयुक्त वाहनांची पूर्ण माहिती घेतली. पहिल्या इंटर सेप्टर वाहनाचे सारथ्य मोनिका साळुंखे यांनी केले. ही वाहने राज्यातील परिवहन कार्यालयांना देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
०००
नीलेश तायडे/विसंअ/