निवडणुकविषयक कामांच्या प्रशिक्षणांवर भर द्यावा – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई दि 13: – आगामी  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  निवडणुकविषयक कामकाजासंदर्भातील सर्व आवश्यक प्रशिक्षणांवर नोडल अधिका-यांनी भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक कामाशी संबंधित नोडल अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ, अपर जिल्हाधिकारी श्री. गोहाड, उपजिल्हाधिकारी दादाराव दातकर व वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शशिकांत काकडे व नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नेमून दिलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी  त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. निवडणूकविषयक कामकाजास सर्वच नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विहित वेळेत कामे पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. सर्व कक्षांच्या समन्वय अधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून प्रत्येक समन्वय अधिकाऱ्याने निवडणूकविषयक कामांचे योग्य नियोजन करावे. आपल्या कामांसंदर्भात पूर्वतयारी व नियोजन अत्यंत चोख करावे असे निर्देश श्री क्षीरसागर यांनी दिले.

येत्या काही  दिवसात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम  जाहीर होईल. त्यानुसार आदर्श  आचारसंहिताही लागू होईल. या काळात काळात निवडणूकविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी  त्यांच्या पातळीवर पथकाच्या स्थापना करावयाच्या आहेत. निवडणूकविषयक कामकाजासंदर्भातील सर्व आवश्यक प्रशिक्षणांवर नोडल अधिका-यांनी भर देण्याचे निर्देशही श्री क्षीरसागर यांनी दिले.

०००