वंचित, मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध – राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दि. 13 मार्च : केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ तळागाळातील गरजू, वंचित, मागास घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज येथे केले.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय अधिकारिता खालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ (एनबीसीएफडीसी), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) या तीन राष्ट्रीय महामंडळांतर्गत भारतातील सर्व राज्यात एक लाख लाभार्थींना सवलतीचे कर्ज वाटप करण्यात आले. यासाठी आयोजित नाशिक जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहायक आयुक्त समाजकल्याण देविदास नांदगावकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक संतोष शिंदे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ओबीसी महामंडळांतर्गत देण्यात आलेल्या कर्जातून रिक्षा खरेदी करून व्यवसाय करणाऱ्या छाया वाकचौरे या महिलेचे कौतुक करून सदर रिक्षातून प्रवास करण्यास आवडेल, असे आवर्जून सांगत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सदर महिलेचा व्यासपीठावर बोलावून सत्कार केला व त्यांच्यासोबत सेल्फी घेतला.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही मार्गदर्शन करताना या विविध योजनांचा लाभ घेऊन मागास घटकांनी स्वतःची उन्नती साधावी, असे आवाहन केले.

नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत मंजूर कर्ज धनादेशाचे व कर्ज मंजुरीपत्राचे वितरण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. तसेच, आयुष्मान कार्डचे वितरणही करण्यात आले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संतोष शिंदे यांनी केले.

देशभरातील एक लाख लाभार्थीना सवलतीचे कर्जवितरण

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय अधिकारिता खालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ (एनबीसीएफडीसी), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एनएसएफडीसी आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी) या तीन राष्ट्रीय महामंडळांतर्गत भारतातील सर्व राज्यात एक लाख लाभार्थीना सवलतीचे कर्ज वाटप करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित केले.

या कार्यक्रमास मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अमोल शिंदे आदि उपस्थित होते.

नाशिक येथील कार्यक्रमात या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. त्यामध्ये पंतप्रधान सामाजिक उन्नती आणि रोजगाराधारित जनकल्याण (पीएम-सूरज) राष्ट्रीय पोर्टलचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पीएम-सुरजच्या माध्यमातून वंचित आणि मागासवर्ग घटकांसाठी आर्थिक सहायता तसेच उद्योगांसाठीचे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. तसेच, प्रधानमंत्री यांचा लाभार्थींशी संवाद व मार्गदर्शन प्रसारित करण्यात आले.

00000