छत्रपती संभाजीनगर, दि.13 (विमाका) : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचे लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत’ या हेतूने यंत्रणांनी काम करावे तसेच देशातील गरीब युवक, शेतकरी, कामगार यांचे हित लक्षात घेत केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. योजनांचा विविध घटकांना लाभ होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर स्वनिधी से समृद्धी संमेलनात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनय टोनसे, बँक ऑफ महाराष्ट्र कार्यकारी संचालक आशिष पांडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन मिलिंद घरड, एसबीआयचे अरविंद कुमार सिंग, प्रदीप पराठे, नाबार्डचे आर. डी. देशमुख, बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय व्यवस्थापक विवेक नाचणे, एसबीआयचे डीजीएम जितेंद्र ठाकूर, श्री. शिरीष बोराळकर, उपस्थित होते.
अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, स्वनिधी से समृद्धी ही गोरगरीब रस्त्यावरील लोकांसाठी योजना आहे. या योजनेमध्ये दहा, वीस आणि पन्नास हजार रूपयापर्यंतचे कर्ज दिले जाते. आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. तसेच सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी स्वनिधी ही महत्त्वाची योजना राहिली आहे. केंद्र सरकरकडून राबविलेल्या वेगवेगळ्या योजनामुळे मोठया प्रमाणात अनेक कुटुंब दारिद्रय रेषेच्या वर आली आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा, जीवन ज्योती, मातृत्व योजना, आयुष्यमान कार्ड, जननी सुरक्षा, गरीब कल्याण, उज्ज्वला योजना या योजनांचा लाभ देखील यापुढे लाभार्थ्यांना मिळणार असून, त्यासाठी स्वनिधी से समृद्धी अभियान सुरू केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांना या अभियानात नोंदणी करून लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. कराड यांनी केले.
महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रधानमंत्री स्वनिधी 37 हजार लाभार्थ्यांपर्यंत वाटप करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना वाटप करणारे छत्रपती संभाजीनगर हे एकमेव शहर आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांना मोठी आर्थिक मदत मिळाली आहे. त्यातून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता आले असून जीवनात परिवर्तन झाले आहे. यामध्ये विशेषतः महिला लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनय टोनसे यांनी या योजनेबाबत माहिती दिली. यावेळी लाभार्थ्यांना कर्जवाटपाचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
*****