देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या शुरविरांचे स्मरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.14 (जिमाक) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शुरविरांमुळे हा महोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. अजूनही आपले शुर सैनिक देशाच्या सिमेवर देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्रपणे काम करत असतात. प्रसंगी आपले प्राण देखील गमावतात. अशा सर्व विरांचे स्मरण करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार व कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड, प्रकाश देशपांडे, रुपाली बेहरे, तहसिलदार निकेता जावरकर उपस्थित होते.

स्वातंत्र्य लढ्यात अनेक शुर विर सहभागी झाले होते. आपल्या प्राणांची पर्वा न करता मातृभूमिच्या रक्षणासाठी या विरांनी शेवटच्या श्वासापर्यंत परकीय सत्तेशी लढा दिला. अजूनही देशाच्या सिमा सुरक्षित ठेवण्यासाठी देशाचा प्रत्येक सैनिक आपले कर्तव्य प्राणपणाने बजावत असल्याचे आपण पाहतो. या सैनिकांमुळेच आपण शांतपणे सुखाची झोप घेऊ शकतो. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाला समोर जाण्यासाठी आमचे शुर विर सैनिक सदैव तत्पर असतात.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढणाऱ्या शुरविरांचे स्मरण करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शुरविरांना वंदन, नमन, स्मरण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. आपल्या जिल्ह्याचा देखील स्वातंत्र्य लढ्यात फार मोठा सहभाग राहिला आहे. स्वातंत्र्याच्या प्रत्येक चळवळीत जिल्ह्याने योगदान दिले आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांनी स्वातंत्र्यासाठी सैनिकांचे फार मोठे योगदान आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना सैनिक व त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत, असे सांगितले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी केले. त्यांनी सत्कार कार्यक्रमाच्या आयोजनामागणी भूमिका यावेळी मांडली.

यावेळी पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते स्वातंत्र्य संग्राम सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाभरातील अनेक स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे यांनी केले तर आभार उपजिल्हाधिकारी रुपाली बेहरे यांनी मानले.

000