वस्त्रोद्योग योजनांचा लाभ आता ई-टेक्सटाईल पोर्टलवर

मुंबई, दि. 15 : वस्त्रोद्योग विभागाच्या  एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार विविध योजनांकरिता ई-टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यात येत आहे. विविध योजनांमधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून त्यांना अनुदान/ अर्थसहाय्य वितरीत करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही सदर प्रणालीमार्फत करण्यात येणार आहे. ही प्रणाली विकसित करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआयसीआय (इंडस्ट्रीयल क्रेडीट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडीया) बँकेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. 

‘सिंहगड’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या सामंजस्य कराराच्यावेळी विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, उपसचिव श्रीकृष्ण पवार, आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रिय प्रमुख विकास देशमुख, बँकेचे प्रदेश प्रमुख सुमंत जोशी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्यावतीने वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार, यांनी तर आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे विकास देशमुख यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

वस्त्रोद्योग विभागाच्या उद्योजकांसाठी असलेल्या विविध अनुदानित योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी आणि त्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आयसीआयसीआय बँक ई-टेक्सटाईल, ऑफीस ऑटोमेशन नावाची प्रणाली विकसित करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात तेथील परिस्थितीनुसार लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती या ऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना मिळणार आहे. या पोर्टलमार्फत शासन आणि लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठीचे खाते सुरू करण्यात येणार आहे. बँकेमार्फत निधी शासनाच्या खात्यात आणि लाभार्थ्यांसाठी असलेल्या खात्यामधून विविध योजनांचे अनुदान पात्र लाभार्थांना वितरीत करण्यात येणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/