छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमुळे संस्कृती आणि परंपरांचे जतन – श्रीमंत बाबाजीराजे भोसले छत्रपती

मुंबई, दि. १५: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केले आणि आपल्या येथील संस्कृती, परंपरा जपल्या गेल्या. त्याकाळच्या इतर शासकांची प्रतिमा आक्रमक अशी होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील जनतेसाठी स्वराज्य निर्मिती केली, असे प्रतिपादन तंजावर संस्थानचे श्रीमंत बाबाजीराजे भोसले छत्रपती यांनी केले.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शुक्रवार दि. १५ व शनिवार १६ मार्च, २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील दीक्षांत सभागृहात ‘शिवसंवाद’ या दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमंत बाबाजीराजे भोसले बोलत होते. महाराणी गायत्रीराजे साहेब भोसले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आणि साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत बाबाजीराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला विश्वास दिला. त्यांच्या मनात स्वातंत्र्याची बीजे पेरली. मावळ्यांची साथ घेत स्वराज्य निर्मिती केली. विधायक पद्धतीने त्यांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली. त्यावेळच्या इतर  शासकांचा राज्यव्यवहार हा जनतेवर जुलूम जबरदस्ती आणि इतरांवर आक्रमणाचा असा होता. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण आजही उठून दिसते आणि तब्बल साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांचे नाव घेतले जाते, असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील केवळ गड किल्ले नव्हे तर तो इतिहासही जपला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० ब्या वर्षानिमित्त महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.. स्वराज्य निर्मिती, छत्रपतींचा जीवन काल हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आरमार, शेती, अष्टप्रधान मंडळ स्थापन करून राज्यकारभार अशा कितीतरी गोष्टी या आजही सर्वांसमोर आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे  विचार लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महानाट्य आयोजित केले जात आहेत. आजच्या परिषदेच्या माध्यमातून आणि त्यात सादर होणाऱ्या शोधनिबंधातून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतके जागतिक वारसा स्थळे आहेत. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांना नामांकन मिळाले असून ते केंद्र सरकार मार्फत युनेस्को कडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चवरे यांनी केले. या परिषदेच्या दोन्ही दिवशीच्या सत्रांमध्ये अनेक ख्यातनाम इतिहास अभ्यासक, लेखक, इतिहासकार व इतिहास संशोधकांची व्याख्याने होणार आहेत.

000

दीपक चव्हाण/विसंअ