नांदेड जिल्ह्यात कोणत्याच मतदान केंद्रावर दिव्यांगांना त्रास होता कामा नये : जिल्हाधिकारी

नांदेड दि. 22 : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये,यासाठी भारत निवडणूक आयोग दक्ष असून जिल्हास्तरावरही दिव्यांगांना कोणता त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे दिले.

दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविणाऱ्या सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबोधित केले.यावेळी प्रत्यक्ष व दूरदुष्यप्रणालीद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन गंगाधर इरलोड,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे,निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी विकास माने, यांच्यासह दिव्यांगाचे प्रतिनिधी प्रशिक्षक नितीन निर्मळ, विशेष शिक्षक पाटील सर आदींची उपस्थिती होती.

दिव्यांगांना मतदानासाठी अडचण जाणार नाही अशा पद्धतीचे मतदान केंद्राकडे जाणारे रस्ते, प्रत्येक मतदान केंद्रावर ज्यांची मतदान आहेत अशांची यादी, त्यांना रांगेत उभे राहावे लागणार नाही यासाठी प्रतीक्षालय, सुलभ रस्ते, पाणी, शौचालय, दृष्टीहीन मतदारांसाठी ब्रेल लिपी, मुबलक प्रकाश व्यवस्था, उपलब्ध करण्याबाबत सूचित करण्यात आले.

लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्व ठिकाणी ही व्यवस्था करण्यात यावी. सर्व ठिकाणच्या व्यवस्थेबाबतची खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले. यावेळी उपस्थित दिव्यांग प्रतिनिधींकडून या संदर्भात आणखी काय काय उपाययोजना करण्यात येऊ शकतात याबाबतची माहिती प्रशासनाने घेतली. मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांना बेसिक साईन लँग्वेजचे प्रशिक्षण देण्याची सूचना यावेळी करण्यात आली. तसेच दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले. या समितीचे सदस्य सचिव समाज कल्याण अधिकारी डॉ. सत्येंद्र  आऊलवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000