मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा संदेश

चंद्रपूर दि.8: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे. स्वीप मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत सायकल रॅली, मिनी मॅरेथॉन, रिल्स, पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मानवी रांगोळीतून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

पोलिस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात मातोश्री विद्यालय, भवनजीभाई चव्हान महाविद्यालय आणि विद्याविहार विद्यालयाच्या जवळपास 2500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, शिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे, आश्विनी सोनवणे (प्राथ.), उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, निवास कांबळे यांच्यासह कलाअध्यापक संघ व इतर शिक्षक उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, विद्यार्थी हे उज्वल भारताचे भविष्य आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे पालक, आजुबाजूचे शेजारी, नातेवाईक व इतर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगात भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे मतदान हा लोकशाहीचा केंद्रबिंदू असून मतदान करणे केवळ हक्कच नाही तर आपले प्रथम कर्तव्य आहे. आपले व देशाचे भविष्य घडविण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. येथे जमलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान 20 लोकांना मतदानाबाबत जागृत करावे. येत्या 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करण्याचा सर्वांना आग्रह करा. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाला किंवा आमिषाला बळी न पडता व स्वत:चे मत न विकता निर्भिडपणे मतदान करा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

विद्यार्थ्यांने मतदार दूत’ बना : मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, भारतीय लोकशाही सर्वात मोठी असल्यामुळे प्रत्येकाने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. जबाबदार नागरिक म्हणून मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आपण सामील झालोच पाहिजे. गत निवडणुकीत 64 टक्के मतदान झाले होते, त्यातही चंद्रपूर शहरात केवळ 53 टक्के लोकांनीच मतदान केले. शहरात सर्व सोयीसुविधा असताना कमी मतदान होणे हे दुर्देवी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही मतदार दूत बनून नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन श्री. जॉन्सन यांनी केले.

विद्यार्थीनींनीही व्यक्त केले मनोगत : मातोश्री विद्यालयाची इयत्ता 10 वी ची विद्यार्थीनी मानसी धपाळे म्हणाली, निवडणुका लोकशाहीचा उत्सव आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती होऊ शकते. हा एक चांगला उपक्रम आहे. निवडणुकीत तरुणांचा सहभाग असणे आवश्यक आहे. प्रशासनाने मतदानाची सुट्टी दिली असली तरी ही सुट्टी फिरण्याकरीता नाही तर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आहे. त्यामुळे सर्व कामे बाजुला सारून नागरिकांनी मतदानाला प्राधान्य द्यावे.

तर भवनजीभाई चव्हाण विद्यालयाची इयत्ता 8 वी ची विद्यार्थीनी अमृणी कवरासे म्हणाली, मतदान व्यवस्था हा आपला कणा आहे. मतदान हाच खरा लोकशाहीचा आधार असून मतदानाचा मुलभूत अधिकारी आपल्याला संविधानाने दिला आहे. देशात लोकशाहीचा जागर आणि संविधानाचा आदर करणे आपले कर्तव्य आहे, असे तिने सांगितले.

यावेळी मानसी धपाळे हिने मतदार संकल्प पत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी निवास कांबळे यांनी केले. संचालन अविनाश जुमडे यांनी तर आभार धनपाल फटींग यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

०००००००