राज्यपाल रमेश बैस यांचा मतदार जागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग: मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी आणि  मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयातर्फे  विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १८१- माहिम विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वाक्षरी मोहीम उपक्रमास राज्यपाल रमेश बैस यांनी भेट देऊन स्वाक्षरी फलकावर सही करून मतदारांनी दि.२० मे रोजी  मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन मतदारांची नोंदणी तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वजनिक निवडणुकीकरिता मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने (Systematic Voters Education & Electoral Participation) समिती गठित करण्यात आली आहे. या समितीतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर आदींसह विविध मान्यवरांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली.

याप्रसंगी माहीम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी या विशेष मोहिमेसाठी पुढाकार घेतला.

0000

काशिबाई थोरात/विसंअ/