मुंबई उपनगर दि. 15 : निवडणूक आचारसंहिता काळात सर्व राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी केले.
लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच श्री. देवरे यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लीकन पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, नामांकन अर्ज व त्यासोबत भरावयाचे विविध नमुने, शपथपत्र याबाबतची प्राथमिक माहिती यावेळी देण्यात आली. उमेदवारांनी त्यांच्या प्रचारासाठी तयार केलेली ऑडिओ- व्हीडिओ जाहिरात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण कक्षाकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दैनंदिन खर्च अहवाल सादर करणे अत्यावश्यक आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी निवडणुकी अगोदर स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारास खर्च मर्यादा ही 95 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे, असे यावेळी श्री. देवरे यांनी सांगितले.
आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी या मतदारसंघात भरारी पथके, स्थिर निरीक्षण पथके क्षेत्रीय स्तरावर नियुक्त करण्यात आली आहेत. उमेदवारांना प्रचारासाठी विविध परवानगी मिळण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय, उमेदवार सुविधा ॲपद्वारेही परवानगीसाठी अर्ज सादर करु शकतात. निवडणूक प्रचारासाठी वाहन परवाना, ध्वनीक्षेपक, सभा, मेळावे, प्रचार कार्यालय उघडण्यासाठी परवाना, मिरवणूक, रॅली, रोड शो, फिरत्या वाहनावरील ध्वनीक्षेपक तसेच हेलिकॉप्टर उतरवणे अथवा उड्डाण करण्यास परवानगी यासाठी या एक खिडकी कक्षातून विहित पद्धतीने अर्ज केल्यास तात्काळ परवानगी देण्याची कार्यवाही केली जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांनी सांगितले.
एका विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील परवानगी असल्यास संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, दोन पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील परवानगी असल्यास संबंधित लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, दोनपेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील परवानगी असल्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मुंबई उपनगर जिल्हा व जिल्ह्याबाहेरील परवानगी असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी स्तरावरुन परवानगी दिली जाईल, अशी माहिती यावेळी श्री. देवरे यांनी दिली.
26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठीची अधिसूचना दिनांक 26 एप्रिल रोजी निर्गमित होणार आहे. या मतदारसंघात एकूण 17 लाख 43 हजार 846 इतके मतदार असून यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 9 लाख 35 हजार 129, महिला मतदार 8 लाख 8 हजार 309 आणि इतर 3918 मतदार आहेत.
0000