मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून मतदानात मुंबई उपनगर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रालाही अग्रस्थानी आणावे, असे आवाहन लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्रसिंग गंगवार यांनी येथे केले.
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार 26 एप्रिल 2024 पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. लोकसभेच्या या चारही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘स्वीप’च्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय (बीएलओ) आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ‘क्षमता विकास आणि जीवन बदलण्याची कला’ या विषयावरील २३ व्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विशेष निरीक्षक श्री. गंगवार बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, निवडणूक निर्णय अधिकारी दादाराव दातकर, ‘स्वीप’चे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, तहसीलदार प्रिया जांबळे-पाटील, स्वीपचे सल्लागार भारत मराठे उपस्थित होते.
विशेष निरीक्षक श्री. गंगवार म्हणाले की, लोकशाहीच्या सक्षमीकरण आणि संवर्धनासाठी मतदारांचे योगदान महत्वाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी संयुक्तरित्या मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व मतदाराला मतदान प्रक्रिया आनंददायी वाटेल यासाठी प्रयत्न करावे.
मतदान प्रक्रिया शांततामय वातावरण, कमी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने होईल यासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
रीच वन टीच वन धोरणाचा अवलंब करावा
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. येथे उपस्थित सर्व मतदार दूतांनी मतदारांमध्ये जागृती करावी व त्यांनीही इतरांचे मतदान करण्यासंदर्भात् प्रबोधन करावे या पद्धतीने मतदानाचा टक्का वाढविण्यास मदत होईल. ‘चुनाव का पर्व – देश का गर्व’ हे घोषवाक्य सार्थकी ठरविण्यात आपला सहभाग खूप महत्वाचा आहे. राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत सर्वांची भागीदारी महत्वाची असून आपण आपली जबाबदारी नक्कीच पार पाडाल, असा विश्वास विशेष पोलीस निरीक्षक एन. के. मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केला.
मतदान जनजागृतीत समूहाचे योगदान मोलाचे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर मतदानाच्या अधिकाराबाबत सविस्तर माहिती मतदारांना देणे आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर घेऊन जाणे इत्यादी महत्त्वपूर्ण कामांची जबाबदारी मतदान केंद्र जनजागृती समूह (बूथ अवरनेस ग्रुप) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या राष्ट्रीय टक्केवारीच्या सरासरीमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान केंद्र जनजागृती समूहाचे योगदान मोलाचे असणार आहे. या कामात आपण सर्वांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी यावेळी केले.
निवडणुकीचे काम करण्यात आणि मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यात काहीही समस्या आल्यास त्या सोडविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सहकार्य करेल. मतदाराचे नाव आणि केंद्राची माहिती मिळविण्यासाठी व्होटर हेल्पिंग ॲपचा वापर करावा. भारत निवडणूक आयोगाच्या www.eci.gov.in या संकेतस्थळावर उमेदवाराची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. तसेच 1950 या हेल्पलाईनवर संपर्क समस्यांचे निराकरण करण्यात येणार आल्याचेही श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.
७५ टक्के मतदानासाठी घेतली शपथ…
‘मी स्वतः मतदान करणार. मित्र मंडळी आणि परिवाराच्या सदस्यांना मतदान करण्यासाठी आग्रह धरणार. तसेच आपल्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी सक्रिय सहभाग घेणार असल्याचे सांगून अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक, क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकारी यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यात ७५ टक्के मतदान करण्यासाठी सकारात्मक आणि उत्साहपूर्वक काम करणार असल्याची प्रतिज्ञा यावेळी घेतली.
एक मत लोकशाहीत परिवर्तन घडवेल…
लोकशाहीच्या संवर्धनासाठी प्रत्येक मत हे महत्वपूर्ण आहे. सकारात्मक आणि एकत्रितरित्या काम केल्यास सोमवार 20 मे 2024 रोजी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नक्की मदत होईल. मुंबई उपनगरात एकत्रित ५२२१ अंगणवाड्या आहेत, त्याअंतर्गत सेविका आणि मदतनीस एकूण १०,४४२ जण आहेत. 4500 आरोग्य सेविका व आशा वर्कर आहेत. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाच्या ८२३ स्थानिक सामाजिक संस्थांचे सफाई मित्र १०,२३६ आहेत. ८३०० बचतगटाचे 80 हजारांपेक्षा जास्त सदस्य आहेत. विविध विभागातील सुमारे ८ हजार क्षेत्रीय कर्मचारी (बीएलओ) आहेत. असे एकूण अंदाजे एक लाख कर्मचारी मतदार दूत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरची मतदार संख्या जवळपास ९८ लाखाच्या आसपास आहेत. आपण कामांची विभागणी करून काम केल्यास प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यास आपण यशस्वी ठरणार असल्याचे स्वीपचे विशेष समन्वय अधिकारी डॉ. दळवी यांनी सांगितले.
मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय समोर ठेवून एक लाख कर्मचाऱ्यांना डॉ. दळवी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी मतदारांशी सकारात्मक पद्धतीने कसे वागावे तसेच त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आत्मविश्वास उपस्थितांमध्ये निर्माण केला. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे केंद्रीय निरीक्षक श्री. गंगवार यांनी डॉ. दळवी यांच्या कार्याचा गौरव केला. जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची अनुभुती घेत कार्यक्रम यशस्वी झाल्याचे गौरवोद्गार काढले.
0000
श्रद्धा मेश्राम/ससं/