युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -‍ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि. 11 (जिमाका) : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी ठाणे शहरात आयोजित केलेल्या रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करावे, असा संदेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना दिला.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील मुख्य रस्त्यावर ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. सदर मॅरेथॉन स्पर्धेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून सुरूवात केली.

प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. प्रत्येकाने येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे असे आवाहन ठामपा सौरव राव यांनी उपस्थित मतदारांना केले.

रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक कर्मचा-यांनी धावपटू मतदारासोबत सहभागी होऊन मतदानाबाबत जनजागृती केली. तसेच स्वीपच्या पथकाने धावपटूंना मतदानाची शपथ दिली. मी मतदान करणारंच… आपण ही मतदानासाठी सज्ज रहा या आशयाचा मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक 20 मे 2024 असलेले माहितीपत्रकाचे वाटपही उपस्थित धावपटू मतदार व नागरीकांना करण्यात आले. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेस धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर तरुणांनी सेल्फी काढून मतदार जनजागृतीच्या घोषणा दिल्या.

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन रन फॉर वोट’ मिनी मॅरेथॉन मध्ये सहभागी असलेल्या सर्व नागरिकांना १४८ विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक मार्फत करण्यात आले.

00000