जुलै पर्यंत १०० टक्के गावे हागणदारीमुक्त करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १२ :- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा – २ चा मुख्य उद्देश संपूर्ण राज्य २०२४-२५ पर्यंत हागणदारीमुक्त करणे हा आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील ३३ हजार ९४७ गावे हागणदारी मुक्त झाली असून, ६ हजार ५२८ गावे जुलैपर्यंत हागणदारी मुक्त करण्यासाठीची कार्यवाही तातडीने राबविण्यात यावी. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येणारी कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री पाटील यांनी दिले.

आज मंत्रालयात स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा – २ च्या कामकाजाचा आढावा आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात घेतला. यावेळी प्रधान सचिव संजय खंदारे, सहसचिव तथा अभियान संचालक शेखर रौंदळ, अवर सचिव चंद्रकांत मोरे, स्मिता राणे आदीसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गावे १४ हजार ९०७ असून, उर्वरित २५ हजार ५६६ गावे मॉडेल बनविण्यासाठी, वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रगतीतील एक लाख १२ हजार शौचालयांचेही बांधकाम, तसेच सार्वजनिक शौचालय बांधकाम अंतर्गत १ लाख २१ हजार बांधकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. तसेच ज्या कामांसाठी निधी केंद्र शासनाकडून प्राप्त होतो, त्या बांधकामांच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे निधीसाठी प्रस्ताव सादर करावा.

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्याकडून ट्रायसायकल व बॅटरी ऑपरेटेड ट्रायसायकलची मागणी प्राप्त करून घेण्याची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी. कचरा विलगीकरण केंद्र, गोबरधन प्रकल्प प्रगती, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रगती, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प प्रगती, मैला गाळ व्यवस्थापन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कामांचा यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी आढावा घेतला.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं