मुंबई दि. १८ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा मंजुरीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या आढाव्यासाठी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये अंदाजित सहा हजार कोटी किंमतीचा दुसरा टप्पा राबविण्यास शासनाने जून २०२३ मध्ये तत्वतः मान्यता दिलेली आहे. पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता तर दुसऱ्या टप्प्यात 6,959 गावांचा समावेश असेल. यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे.
या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शासनाने निश्चित केलेले शेती उत्पादकता वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, शेतीमध्ये कर्बग्रहण वाढविणे हे उद्देश साध्य करावेच. शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले धान्य प्रक्रिया करून साठवणूक करण्याची यंत्रणा उभी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संशोधन व्हावे. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या व विद्यापीठांनी विकसित केलेला छोट्या यंत्रांचा वापर होण्यासाठी सुद्धा या प्रकल्पातून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केली.
या बैठकीस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, कृषी उपसचिव संतोष कराड यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
0000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/