विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
10

सोलापूर दि.19(जिमाका):- शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन  उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर  शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, करिअर विषयक मार्गदर्शक सुनील चोरे,नितीन शेळके, श्रीकांत घाडगे, दाजी ओबांसे, डॉ. संदीप तापकीर, राम सुतार तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, शासनाने कौशल्य विकास विभागाअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध कोर्स आहेत.  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबरोबर कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आलेला आहे. शासनाकडून तरूणांना उद्योग सुरू करण्यासाठी विविध सवलतीच्या कर्ज योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या कर्ज योजनेचा फायदा घेऊन उद्योग उभारून नोकरी देणारे बनावे. तसेच भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना शिक्षणासोबत रोजगार प्राप्त होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकास केल्यास त्यांना परदेशात मोठ्या पगाराची संधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटनाच्या उद्योग व्यवसायासाठी शासनाच्या विविध व्याज परताव्याच्या योजना आहेत. तरुणांनी नोकरी न करता उद्योग उभारून नोकरी देणारे बनावे तसेच पर्यटन क्षेत्रात करिअर करावे. उद्योग उभारून रोजगार मागण्या पेक्षा रोजगार देणारे व्हावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या शिबिरास एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना नामवंत शिक्षण तज्ञांकडून भविष्यातील शिक्षण व करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here