आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 24: मान्सून कालावधीत आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. एखाद्या ठिकाणी आपत्ती उद्भवल्यास तेथील नागरिकांपर्यंत प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी लवकरात लवकर पोहोचून मदत करतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात अतीवृष्टी व दरड प्रवण क्षेत्रात करावयाच्या उपायोजनांचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, गावांमध्ये पूर किंवा दरडी कोसळल्या तर तेथील नागरिकांची विविध शाळांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. या शाळांमध्ये औषधे, पिण्याचे पाणी, अन्नधान्य, लाईट या सह सर्व सुविधा सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. संभाव्य आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी 1 जुलै पासून एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन व एनडीआरएफ मार्फत पूर प्रवण व दरड प्रवण तालुक्यामध्ये शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम तसेच साहित्याची चाचणी घेण्यात आलेली आहेत.
दरड कोसळून रस्ते वाहतूक विस्कळीत होणारी नाही यासाठी मेढा- महाबळेश्वर घाट, पसरणी घाट, चिपळून-कराड मार्ग, सज्जनगड-ठोसेघर मार्ग, महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग व शेंद्रे ते बामणोली मार्गावर जेसीबी, पोकलेन, क्रेन व डंपर इत्यादी वाहने ठेवण्यात आलेली आहेत. डोंगरी तसेच पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांनी मान्सून  कालावधीत सतर्क रहावे, असे आवाहनही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस   जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी सुनिल गाढे, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे  यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळ्यानंतर करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बांधकामाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. मातोश्री पाणंद रस्त्याची चारशेहून अधिक कामे मंजूर आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकाला  तीन ते चार कामे वाटून द्यावीत.  कामे वेळेत होण्यासाठी रोहयो व ग्रामपंचायत विभागाने वेळोवेळी आढावा घ्यावा.
प्रधानमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषदेकडील रस्त्यांचा कामांचा  व कोयना भूकंप पुनर्वसन निधी,डोंगरी विकास निधीमधील कामांचाही आढावा घेतला.
या बैठकीनंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हा परिषद आवारातील लोकल बोर्डाच्या इमारतीच्या व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पोवई नाका येथील उभारण्यात येत असलेल्या पुतळ्याच्या कामाची पहाणी केली. ही कामे दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.