मुंबई, दि. 3 : आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, 2024 घोषित केला आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आयोगाने शहरातील उत्तुंग व समूह इमारतींमध्ये तसेच निवासी गृहरचना संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यावर भर दिला आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या 22 ऑगस्ट, 2012 रोजीच्या परिपत्रकानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक यांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेतील मतदार नोंदणीस पात्र होणारे रहिवासी, सोसायटीतील जागा सोडून गेलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती यांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना पुरवावी. त्याचप्रमाणे सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांनी सोसायटीतील रहिवाशांना मतदार नोंदणी व दुरुस्ती करुन घेण्याबाबत आवाहन करावे.
गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेत मतदान केंद्र सुरु करण्याकरिता आपल्या गृहनिर्माण संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, अंदाजित मतदार संख्या इत्यादी माहितीसह आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) / मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच Online अर्ज भरण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या http://ceo.maharashtra.gov.in ऑनलाईन पद्धतीने या संकेत स्थळावरील https://forms.gle/twLTGpjzzy2x9eV36 व https://forms.gle/z261Ah4DDgQxSEvs9 या गुगल लिंकवर आपला अर्ज भरता येणार आहे. मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, 2024 (दुसरा) या राष्ट्रीय महत्वाच्या कार्यक्रमामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. रहिवाशांसाठी निवासाच्या जवळ आणि सोयीच्या ठिकाणी मतदान केंद्र उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
000
संजय ओरके/वि.सं.अ./