मुंबई दि. 4 : विधान परिषद महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने वरिष्ठ सभागृह आहे. त्याचा नावलौकिक उंचावणारी कामगिरीच आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी केली आहे. या कामगिरीची दखल विधिमंडळाच्या कामकाजाच्या रुपाने इतिहास म्हणून नोंदवली गेली आहे. येणाऱ्या पिढ्यांना या सदस्यांचे काम या कामकाजाच्या नोंदीवरून अभ्यासता येईल. त्यातून प्रेरणा घेता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आज निरोप देण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विधानपरिषदेतील सदस्य विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील, अॅड. अनिल परब, महादेव जानकर, डॉ. मनीषा कायंदे, विजय ऊर्फ भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. मिर्झा वजाहत, डॉ. प्रज्ञा सातव, जयंत पाटील या सदस्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राचे हे वरिष्ठ सभागृह वैशिष्ट्यपूर्ण असून देशात सहा राज्यातच हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाकडे आदराने पाहिले जाते. या देशाला संसदीय कार्यप्रणालीचा आदर्श घालून देणारी व्यक्तिमत्व अनेक दिग्गज, विद्वान या सभागृहाचे सदस्य होऊन गेले आहेत. या सभागृहातूनच महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाचे असे कायदे केले गेले आहेत. आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी या सभागृहाच्या परंपरेला पुढे नेण्याचे काम केले आहे. राज्याच्या वरिष्ठ सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करुन जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम या सर्व सदस्यांनी केले. आपल्या कामातून या सर्वांनी वरिष्ठ सभागृहाचा लौकिक वाढवला असून जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. तसेच यावेळी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पुढील वाटचालीसाठी मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या.
ही निवृत्ती नव्हे, तर वेगळ्या कार्यकाळाची सुरुवात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानपरिषदेतील कार्यकाळ पूर्ण झालेल्या सदस्यांची ही निवृत्ती नाही किंवा त्यांना निरोप नाही, तर त्यांचा एक कार्यकाळ संपतोय आणि ते दुसऱ्या वेगळ्या कार्यकाळाची सुरूवात करताहेत, असे मी मानतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. विधानपरिषदेत ज्यांनी चांगले काम केले त्यांच्या कार्याची दखल सभागृह नेहमीच घेते. चांगले काम केलेल्या सदस्यांचे कौतुक करण्याची संधी अशा निरोप समारंभातून मिळते, असेही ते म्हणाले. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जीवन काळात त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा घेऊन श्री.फडणवीस यांनी सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व संसदीय आयुधे वापरून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य सदस्यांनी केले – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
विधानपरिषदेतील १५ सदस्यांच्या निवृत्तीनिमित्त विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच पुनरागमन झालेल्या सदस्यांचे अभिनंदन केले.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात सर्व सदस्यांनी जनतेच्या समस्या मांडण्यासाठी प्रश्न, लक्षवेधीसह विविध संसदीय आयुधे वापरली. त्यांचे समाजकारण पुढेही असेच सुरू रहावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सदस्य श्री. पोतनीस यांनी सभागृहात नेमक्या शब्दांत विशेष उल्लेख, लक्षवेधी अशा विविध आयुधांचा त्यांनी वापर केला. अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली. वैद्यकीय, क्रीडा क्षेत्र यामधील अनेक प्रश्नांवर त्यांनी लक्षवेधी मांडली. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
श्री. डावखरे सर्वांच्या मदतीला धावून जातात. त्यांचे वडील वसंत डावखरे यांनी उपसभापती म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यातून मार्गदर्शन घेऊन आज मी काम करीत आहे. किशोर भिकाजी दराडे हे साध्या आणि सरळ मार्गाने समस्यांची मांडणी करण्याची पद्धत वापरत आले आहेत. विधवा पेन्शन संदर्भातील समस्या त्यांनी पाठपुरावा करून कायम सभागृहात मांडल्या. आंध्र प्रदेश येथे आलेल्या पुरात लोकांचे पुनर्वसनाचे काम कपिल पाटील यांच्यासह आम्ही एकत्रित काम केले. वंचितांचे प्रश्न आत्मीयतेने सभागृहात मांडले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. अनिल परब यांच्या पुनरागमनासाठी उपसभापती यांनी शुभेच्छा दिल्या. सदस्य ॲड. परब हे कालमर्यादेत आणि संसदीय नियमानुसार काम करीत. अतिशय सदृहदय कार्यकर्ता आहेत. महादेव जानकर यांचा आत्तापर्यंतचा प्रवास संघर्षमय सुरू आहे. मात्र त्यांनी जे काम केले ते जनता विसरणार नाही. मंत्री म्हणून त्यांनी फार चांगले काम केले आहे. मनीषा कायंदे या प्रश्न आणि लक्षवेधी खूप धडपडीने मांडत असतात. भाई गिरकर दलित, मागासवर्गीय कष्टकरी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी कायम आग्रही राहिले आहेत. बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरीमध्ये साईबाबांसाठी निधी मिळावा यासाठी तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी लक्षवेधी चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडल्या आहेत. निलय नाईक यांचा जुना परिचय आहे. कौटुंबिक संबंध असल्याने एक चांगले युवक आमदार म्हणून काम करत असल्याचा आनंद आहे. रमेश पाटील यांनी अभ्यासपूर्ण प्रगती केली आहे. यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. रमेश पाटील यांच्या कारकिर्दीत मत्स्य शेतीच्या उत्पनासारखे महत्त्व दिले. रायगडच्या प्रश्नांना चालना देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. डॉ. मिर्झा वजाहत यांनी वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित ज्ञानाचा उपयोग समाजकार्य करताना केला आहे. प्रज्ञा सातव यांनी संकटात उभे राहून काम केले आहे. अनेक नकारात्मक गोष्टींना सामोरे जात काम केले आहे. जयंत पाटील यांनी रायगड, मच्छिमार यांच्या प्रश्नावर कायम भूमिका मांडत आले आहेत. अशा शब्दांत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निवृत्त सदस्यांना पुढील आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यानंतर विधिमंडळात विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , विधानपरिषदेच्या उपसभापती यांच्यासमवेत सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदस्य सतेज पाटील, शशीकांत शिंदे, ॲड. अनिल परब, कपिल पाटील, विजय भाई गिरकर, श्रीमती मनीषा कायंदे, डॉ. वजाहत मिर्झा, किशोर दराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
०००
राजू धोत्रे/विसंअ/