मुंबई, दि. 9 : सिल्लोड तालुक्यातील बंधारे व पाझर तलाव संदर्भातील कामांबाबत कार्यवाही व गोदावरी मराठवाडा विकास महामंडळांअंतर्गत विषयांबाबत लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र बैठक घेऊ, असे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणी प्रकल्पाबाबत मंत्री श्री. सत्तार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे उपस्थित होते, तर गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तीरमनवार हे दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. हा विषय पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव व सिल्लोड तालुक्यातील बंधारे व पाझर तलाव, निजामकालीन बंधाऱ्यांबाबत माहिती घेण्यात आली आहे. सिल्लोड शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात बाराही महिने पाणी उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करणे व गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ अंतर्गत विविध निर्धारित कामे पूर्ण होण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाही संदर्भात यावेळी मंत्री श्री.सत्तार यांनी सूचना केल्या.
00000
किरण वाघ/विसंअ/