नाशिक, दिनांक 14 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास शहरासोबतच ग्रामीण भागातही महिलांचा उत्तुंग प्रतिसाद लाभताना दिसत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनातर्फे विविध शिबिरे आयोजित केली जात आहेत.
दाभाडी ग्रामपंचायत येथे आयोजित शिबिरास पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव दौऱ्यावर असताना भेट दिली. दाभाडी ग्रामपंचायत व एकात्मिक बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास आलेल्या स्थानिक महिला भगिनींशी व कर्मचाऱ्यांशी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संवाद साधला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या विकासासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळ्या जनकल्याणकारी महिला हक्काच्या योजना अधिवेशनात अंमलात आणल्या. त्यातीलच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ महिला भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरणारी योजना आहे.
यावेळी सरपंच प्रमोद निकम, मनोहर बच्छाव व कर्मचारी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
00000