सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
13

पुणे दि.१६: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि शासकीय तंत्रनिकेतन पुणेच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशनचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक स्तरावर मागणी येईल असे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 शासकीय तंत्रनिकेतन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक, विभागीय सहसंचालक डॉ.दत्तात्रय जाधव, सचिव डॉ. महेंद्र चितलांगे, प्राचार्य डॉ.राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले,  उत्तमता वाढविल्याशिवाय देशातील मनुष्यबळ आणि उत्पादनाला जागतिक पातळीवर मागणी वाढणार नाही. त्यादृष्टीने शासकीय तंत्रनिकेतनच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. शासकीय संस्थांनी उद्योगांसोबत सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. केंद्र सरकारही शासकीय तंत्रशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी निधी देण्यास तयार आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन संस्थांनी नव्या कल्पना समोर आणाव्यात, त्यानुसार उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शासकीय तंत्रनिकेतन अधिक समृद्ध आणि परिपूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. जगभरात आज कुशल मनुष्यबळ आवश्यक असताना अशा संस्था उत्तमरीतीने चालविणे, तेथे सुविधा देणे गरजेचे आहे. म्हणून शासनाने अशी राज्यात तीन उत्कृष्टता केंद्र मंजूर केली असून त्यातील पहिले पुण्यात सुरू होत आहे. ४१ तंत्रनिकेतनमध्ये १ हजार ६०० विद्यार्थ्यांसाठी सीईटीची क्षमता वाढवून त्यासाठी संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.

मुलींच्या शिक्षणाला शासन प्रोत्साहन देत असून त्यांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत मुलींचे वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव दिल्यास त्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. पाटील म्हणाले.

आमदार शिरोळे म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतन इमारतीला ऐतिहासिक महत्त्व असून अशा इमारतीत पहिले उत्कृष्टता केंद्र स्थापित होण्याला वेगळे महत्व आहे. तंत्रनिकेतमध्ये अनुभवाधारीत शिक्षण मिळत असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणे महत्त्वाचे असते. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत अशा सुविधा असल्याने जागतिक पातळीवर यश मिळविणारे विद्यार्थी संस्थेतून घडावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ.नाईक म्हणाले, तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले आणि उद्योगाचे आधुनिक तंत्रज्ञान असलेले अशा स्वरूपाचे हे पहिलेच उत्कृष्टता केंद्र आहे. उद्योगातील रोबोटिक्स तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध झाल्याने रोजगार मिळवून देण्यासाठी आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्राचार्य डॉ.पाटील यांनी प्रास्ताविकात सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशन आणि शासकीय तंत्रनिकेतन विषयी माहिती दिली.

यावेळी मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते बहुउद्देशीय संगणक प्रयोगशाळेचेही उद्घाटन करण्यात आले.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here