मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री उदय सामंत

रायगड(जिमाका)दि.16:- मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिशन मोडवर काम करावे. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते आरसीएफ हॉल कुरुळ, अलिबाग येथे आज करण्यात आला.  तसेच जिल्हा परिषद शेष फंडातील निधीतून महिला बचतगट व दिव्यांगांना ई-शॉप वाहन वितरण करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)रविंद्र शेळके, अतिरिक्त्‍ मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण निर्मला कुचिक,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना लागू केल्याबद्दल राज्यशासनास मन:पूर्वक धन्यवाद देतो. महिलांच्या सर्वांगीण विकासाचा

उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी 46 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

ही योजना केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून कायमस्वरुपी आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले, या योजनेत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरुन घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत.  या योजनेमध्ये महिलांची फसवणूक करणाऱ्या व्यक्ती, संस्था विरुध्द फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत. त्यामुळे महिलांनीही शासकीय यंत्रणेच्या नियमानुसार कार्यवाही करावी. हे राज्य शासन महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनामार्फत  महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये एसटीमध्ये 50 टक्के सवलत, शुभमंगल योजना यांचा समावेश आहे. महिलांना सक्षम करणारे हे शासन आहे. प्रशासनाने  मेहनत घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात, असेही पालकमंत्री म्हणाले.

अंगणवाडी सेविकांसाठी पुण्याचे काम

या योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत भरण्यात येत आहेत. आपल्याच महिला भगिनींसाठी या योजनेचा लाभ देण्यास अंगणवाडी सेविकांचा हातभार लागत आहे. हे काम त्यांच्यासाठी पुण्याचे आहे. अंगणवाडी सेविकांना त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद देतो, असेही पालकमंत्री म्हणाले.

समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार विद्यावेतन तरुणांना देणारी योजना सुरु केली आहे. शुभमंगल योजनेचे अनुदान 10 हजारावरुन 25 हजार केले आहे. तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचाही निर्णय घेतला आहे. 7.5 एचपी पंप असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीज बील माफीचा निर्णय घेतला असल्याचेही पालकमंत्री  श्री.सामंत  यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील सीआरपी महिलांना मोबाईल देण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी दिले.

जिल्हयात बचत गट विक्री केंद्रांची उभारणी करणार

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्ह्ययात प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय बचतगट विक्री केंद्र करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी केली. त्यासाठी प्रत्येकी 25 लाख अनुदान जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबध्द असून दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी एका वर्षाकरीता 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत  21 ते 65 वर्षे वयोगटातील अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करावेत; ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरीता गावतील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आदी स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधावा. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांनादेखील जुलै महिन्यापासून लाभ मिळणार असल्यामुळे महिलांनी अर्ज करण्याकरीता गर्दी करु नये.  अर्ज करतांना येणाऱ्या अडचणीचे निराकारण करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून 3 हजार रुपये 19 ऑगस्टपर्यंत (रक्षाबंधन) थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

यावेळी लाभार्थी महिलांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

सौ.रश्मी सागर म्हात्रे, मु.तळ, पो.बामणगाव, ता.अलिबाग, सौ.पुनम उदय नाईक, मु.तळ, पो.बामणगाव, ता.अलिबाग,  कु.जुई किशोर नाईक, मु.तळ, पो.बामणगाव, ता.अलिबाग, सौ.वैशाली विनायक म्हात्रे, मु.तळ, पो.बामणगाव, ता.अलिबाग, सौ.वैष्णवी विजेद्र ठाकूर, मु.खारीकपाडा, पो.बामणगाव, ता.अलिबाग, श्रीम.सुरेखा सुरेश ठाकूर, मु.खारीकपाडा, पो.बामणगाव, ता.अलिबाग, सौ.किर्ती विनोद ठाकूर, मु.खारीकपाडा, पो.बामणगाव, ता.अलिबाग, सौ.तेजश्री तुकाराम ठाकूर, मु.खारीकपाडा, पो.बामणगाव, ता.अलिबाग, सौ.समृध्दी अजय वरसोलकर, मु.खारीकपाडा, पो.बामणगाव, ता.अलिबाग या पात्र ठरलेल्या महिलांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

यावेळी ई-रिक्षा टेंपोच्या चाव्या महिला बचतगट व दिव्यांग बांधवांना पालकमंत्री श्री.सामंत यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आल्या.

या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लाभार्थी महिला, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

०००००००